राज्यात अगोदरच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना, आता ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा देखील पुढे आलेला आहे. यावरून आता ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. शिवाय, भाजपाने देखील राज्य सरकारवर या मुद्य्यावरून जोरदार टीका करत, २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजपा नेत्यांच्या आज या संदर्भात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करत,“राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आलं ” असं म्हटलं आहे.

“केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने समाजात अतिशय संतप्त भावना आहेत. न्यायालयात प्रकरण सुरू असताना केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे मोठा फटका समाजाला बसला आहे. ” अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर आज भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे व चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारपरिषदेत घेत याबाबत घोषणा केली.

OBC reservation : २६ जून रोजी राज्यभरात एक हजार ठिकाणी भाजपाचे चक्काजाम आंदोलन!

तर, “ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. हे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करू आणि गरज पडली तर न्यायालयात जाऊ, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.” असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे यांचा ठाकरे सरकारला इशारा

या बैठकीला पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, अतुलजी सावे, डॉ. संजय कुटे, मनिषा चौधरी, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ आदी उपस्थित होते.