जिल्ह्यात करोना बाधितांची दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने सात ते १३ जुलै या कालावधीत जळगाव महापालिका क्षेत्र आणि भुसावळ, अमळनेर पालिका क्षेत्रात कठोर टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. या टाळेबंदीत किराणा दुकानेही बंद ठेवण्यात येणार असून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे.
प्रशासनाच्या वतीने अनेक प्रयत्न करूनही जिल्ह्य़ात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. रूग्णसंख्या चार हजारपेक्षा अधिक झाल्याने सतर्क झालेल्या प्रशासनाने पुन्हा एकदा संपूर्ण टाळेबंदीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार मंगळवारपासून सात दिवस नागरिकांना दोन किलोमीटर परिसरातील दुकानांमधूनच औषधे, दूध घेण्यासाठी परवानगी असेल. नागरिकांना दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने वापरण्यास बंदी राहील.
एमआयडीसीतील कंपन्यांसाठी होणाऱ्या वाहतुकीला या टाळेबंदीतून सवलत देण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, अमळनेर येथील बाजार समितीत केवळ घाऊक आणि ठोक विक्रीचे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ खरेदी-विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी असणार नाही.
रूग्णांना डॉक्टरांची गरज असेल तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या बाहेर जाता येईल. शेती कामांसाठी बी-बियाणे, किटकनाशके खरेदी करण्यासाठी संबंधीत क्षेत्राबाहेर जाता येईल. परंतु, त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. टाळेबंदीच्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल, डिझेल विक्रीची परवानगी आहे.
टाळेबंदीत किराणा दुकान, दारू दुकान, केश कर्तनालय, खासगी कार्यालय, कुरिअर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, गॅरेज, उद्याने हे सर्व बंद राहणार आहे. औषधालय, हॉटेल आणि रेस्टॉरंटमधून केवळ पार्सल सुविधा, दूध खरेदी-विक्री केंद्र, कृषी संबंधित कामे, कृषी केंद्र, शासकीय कार्यालये, बॅंका सुरू राहतील. जळगाव, भुसावळ आणि अमळनेर शहर वगळता जिल्ह्य़ाच्या इतर भागात सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत. नागरिकांनी करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.