भंडारा दुर्घटनाप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती

भंडारा/नागपूर :  भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर कक्षाला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यासाठी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे रविवारी सांगितले. या प्रकरणात जाणीवपूर्वक कारवाई केली जाणार नाही. पण दुर्लक्ष झाले असेल तर माफी नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी डॉ. साधना तायडे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय चौकशी समितीची घोषणा केली होती. मात्र रविवारी मुख्यमंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन तायडे यांच्याऐवजी विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे स्पष्ट केले. या समितीमध्ये तज्ज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगडाले यांच्यासह आरोग्यसेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ज्ञांचा समावेश असेल.  मुख्यमंत्री म्हणाले,  या आगीची सखोल चौकशी करताना कुठलीही कसर ठेवली जाणार नाही. दुर्घटना नेमकी कशी घडली? अपघात अचानक घडला की आणखी कोणती कारणे आहेत, हे तपासले जाईल. घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जाईल. करोना काळात इतर अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष झाले का?  हे सुद्धा तपासले जाईल. महिनाभरात त्याचा अहवाल येईल.

‘चांगली आरोग्यसेवा हे कर्तव्य’

राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा  उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतानाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही  तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जिवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी सक्तीची  करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

‘पालकांचे सांत्वन करण्यासाठी शब्द नाहीत’

या दुर्घटनेत जीव गमावलेल्या बालकांच्या कुटुंबीयांचे रविवारी मुख्यमंत्र्यांनी भोजापूर येथे जाऊन सांत्वन केले. बाळ गमावलेल्या गीता विश्वनाथ बेहरे कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. इतकं   प्रचंड दु:ख झालंय अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. बेहरे कुटुंबातील नवजात बालिकेवर वजन कमी असल्यामुळे दोन महिन्यापासून शिशु केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते.