वाढीव शुल्क भरत नसल्याच्या कारणावरून येथील सेंट फ्रान्सिस स्कूल व्यवस्थापनाने सुमारे ५० विद्यार्थ्यांना डांबून ठेवल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी मुख्याध्यापिकेच्या पतीने पालकास धक्काबुक्की केली. स्थानिक आमदार व पोलिसांनी धाव घेतल्यानंतर डांबून ठेवलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली. शहरातील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या वाढीव शुल्काचा वाद वर्षभरापासून सुरू आहे. शिक्षण विभागाने ही शुल्कवाढ बेकायदेशीर ठरवली असुनही व्यवस्थापन वाढीव शुल्क भरण्यासाठी तगादा लावत असल्याची तक्रार आहे. पालकांनी ही रक्कम भरावी म्हणून मंगळवारी शाळेने वेगळाच पवित्रा स्वीकारला.