सात वर्षांनंतर दोनही नेते एका व्यासपीठावर

राजकारणात कोणीही कायमस्वरूपी एकमेकांचे शत्रु अथवा मित्र राहात नसल्याचे रविवारी सायंकाळी येथे आयोजित एका कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले. एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे सात वर्षांनंतर भजी महोत्सवानिमित्त एकत्र आले. एवढेच नव्हे, तर या महोत्सवात सुरेश जैन यांनी खडसे यांना बटाटा भजी, तर खडसेंनी जैन यांना मिरची भजी भरवली. राज्याच्या राजकारणावर प्रभाव ठेवून असणाऱ्या जिल्ह्य़ातील या दोन दिग्गज नेत्यांमधील हे सामंजस्याचे चित्र यापुढेही कायम राहील काय, हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये विचारला जात आहे.

मराठी प्रतिष्ठान व नवजीवन सुपरशॉप यांच्या वतीने मेहरूण तलावाच्या काठावर भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खडसे-जैन यांच्यातील राजकीय वैर राज्याला नवे नाही. विधान परिषद निवडणुकीत खडसे यांचे पुत्र निखील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनिष जैन यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यात सुरेश जैन यांनीही मनिष जैन यांना साथ देत त्यांना निवडून आणले होते. यामुळे खडसे-जैन यांचे वैर वाढले होते. त्यानंतर काही महिन्यांनी निखील खडसे यांनी आत्महत्या केली. पुढे जळगाव पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना साडेचार वर्षे कारागृहात काढावे लागले. या कालावधीत जिल्ह्य़ात आपली ताकद वाढविण्यासाठी खडसेंनी जोरदार प्रयत्न केले. जामिनावर बाहेर आल्यापासून सुरेश जैन यांनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे टाळले आहे. त्यांचे शिष्य माजी आमदार मनिष जैन हे देखील राजकारणापासूनच नव्हे, तर जळगावपासून देखील लांब आहेत. या कालावधीत खडसे-जैन समोरासमोर येण्याचा प्रसंगच घडला नाही.

भजी महोसत्वानिमित्त खडसे, सुरेश जैन, आणि ईश्वरलाल जैन हे तीनही नेते प्रथमच एकत्र आले. यावेळी खडसे यांनी आपल्या मळ्यातील सिडलेस जांभळं आणली होती. ती जैन यांना दिली. जैन यांनी त्यांचा आस्वाद घेतला. खडसेंनी जैन यांच्या तब्येतीची विचारपूसही केली. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, अ‍ॅड. केतन ढाके तसेच आयोजक अ‍ॅड. जमील देशपांडे, विजय वाणी, प्रमोद बऱ्हाटे, अनिल कांकरिया उपस्थित होते.