अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. सुशांत सिंहनं आत्महत्या केल्यानंतर या घटनेची चौकशी करण्याची मागणी समोर आली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात यावं, अशी मागणी होत आहे. दरम्यान, बिहार सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे. त्यावरून काँग्रेसनं नितीश कुमार सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतल्याचं नितीश कुमार यांनी सांगितलं. या निर्णयावर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या; बिहार सरकारकडून सीबीआय चौकशीची शिफारस

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणी एक ट्विट केलं आहे. “मोदी सरकार व भाजपा भारतात लोकशाहीची रचनाच उद्ध्वस्त करत आहे. हे पाहून वाईट वाटतंय की, घटनेला मोडीत काढण्यात भाजपाचे मित्रपक्ष त्यांना मदतच करत आहेत. राजकीय फायद्यासाठी संघराज्य संरचनेची कायमची हानी होणार आहे. देशाबद्दल आम्हाला वाटणारी ही चिंता आपली न्यायालये समजून घेतील, अशी आशा आहे,” सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सुशांतच्या बँक खात्यातून ५० कोटी रुपये काढले गेले, याबाबत मुंबई पोलीस गप्प का?- बिहारचे पोलीस महासंचालक

आणखी वाचा- “… त्यामुळे यात काहीतरी चुकीचं वाटतंय”; बिहारच्या पोलीस महासंचालकांचा मुंबई पोलिसांवर आरोप

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या करून दीड महिना लोटला आहे. मात्र, हे सातत्यानं चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात फिर्याद दाखल केली होती. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह तिच्यावर फसवणुकीचाही आरोप केला होता. या प्रकरणाच्या तपासावरून आता बिहार पोलीस मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित करत आहे. त्याची चर्चा सुरू असतानाच नितीश कुमार सरकारनं ही केस सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आहे.