माजी खासदार शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी केलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली असून शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही; परंतु ही माहिती प्रसारित होताच त्यावर संतप्त होत शेट्टी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला. यानंतर शरद पवारांनी स्पष्टीकरण देत नाव वगळलं नसल्याचं सांगितलं. मात्र आता राजू शेट्टी यांनी यावरुन शरद पवारांना टोला लगावला आहे.

राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“आमदारकीसंबंधी मला काहीच बोलायचं नाही. या बातम्या कोणी आणि कशासाठी पेरल्या याची मला माहिती आहे. पण ज्या तत्परतेने शरद पवार यांनी आमदारकीबाबत खुलासा केला तितक्याच तत्परतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलले असते तर अधिक आनंद झाला असता,” असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

“आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार”; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा

“शरद पवार महाविकास आघाडीचे प्रमुख असून राज्यातील पूरग्रस्तांना बेदखल करण्यात आलं आहे. शेतीचे पंचनामे करुन दोन आठवडे झाले असतानाही अजून निर्णय का घेण्यात आलेला नाही यावर त्यांनी भाष्य करायला हवं होतं,” असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे.

शरद पवारांनी काय म्हटलं –

शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मी दिलेला शब्द पाळलेला आहे असं सांगितलं होतं. “राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्यामध्ये राजू शेट्टी यांनी सहकाराच्या क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिलं आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधानपरिषदेवर घ्यावं, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्यासंबंधीचा अंतिम निर्णय हा राज्यपालांकडून आलेला नाही. त्यामुळे एकदा आम्ही हा निर्णय घेतल्यानंतर, या निर्णयाबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना, मला आश्चर्य वाटतं की अशाप्रकारची विधानं कशी केली जातात? किंवा आणखी काय, काय… पण आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केलेलं आहे. राजू शेट्टींना काय वक्तव्य करायचं असेल, तर मला त्यावर भाष्य करायचं नाही. पण मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतो आहोत,” असं शरद पवारांनी सांगितलं होतं.

जलसमाधी आंदोलन

पूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी शेट्टी यांनी बुधवारपासून पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली आहे. ही यात्रा उद्या रविवारी नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शेट्टी यांच्या या आंदोलनावरून प्रशासन सज्ज झाले आहे. नरसिंहवाडी येथे जाणारे रस्ते रोखण्यात आले असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. तर शेट्टी यांना मार्गातच रोखण्याची नीती अवलंबण्यात येण्याची चिन्हे आहेत. असे झाले तर स्वाभिमानीचे कार्यकर्ते गनिमी कावा करण्याची शक्यता आहे.