“आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार”; राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा

राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली

Swabhimani Shetkari Sanghatna, Raju Shetty, NCP, Sharad Pawar, Vidhan Parishad
राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेत्यांवर टीकाटिप्पणी करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी ही यापूर्वी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी राज्यपालांची भेट घेतली असून यासंबंधी पत्रही दिलं आहे. दरम्यान राजू शेट्टी यांच्या जागी हेमंत टकले यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. अद्याप याबाबत राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली असून मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशाराच राष्ट्रवादीला दिला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

सत्ताधाऱ्यांवरील टीका राजू शेट्टी यांना भोवली

“लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीचा झालेला एक समझौता होता. तो पाळायचा किंवा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचं आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही काय त्यांच्या दारात भीक मागायला गेलो नव्हतो. त्यामुळे काही झालं तरी मला आमदार करा नाहीतर जीव सोडणार असं माझं म्हणणं नाही आहे. गेल्या अडीच वर्षांपासून मी कोणत्याच पदावर नाही. म्हणून काय लोकांच्या मनातील स्थान कोणी हिरावून घेऊ शकत नाही,” असं राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं. करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो तो मी करेन असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

…तर महागात पडेल, राज्य सरकारला इशारा

तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी राजू शेट्टी यांनी बुधवारी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केली. यात्रा नरसिंहवाडी येथे पोहोचल्यानंतर जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. यासंबंधी त्यांनी भाष्य केलं. “मी विचार केल्याशिवाय कोणता निर्णय घेत नाही. २३ ऑगस्टलाच मी शासनाने महापुरात झालेल्या पिकांच्या नुकसानावर काढलेलं कर्ज माफ करावं अशी मागणी सरकारकडे केलो होती. पूराला आता दीड महिना झाला असून नव्या पिकासाठी पैशांची गरज आहे. जुनं कर्ज माफ झाल्याशिवाय नवं कर्ज मिळणार नाही. त्यानुसार शेतीचं नियोजन करता येईल,” असं सांगत राजू शेट्टी यांनी आंदोलनावरील भूमिका मांडली.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांची पंचगंगा परिक्रमा

आम्हाला ठोस निर्णयाची अपेक्षा असून केंद्राप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलं तर महागात पडेल असा इशारा यावेळी राजू शेट्टींनी दिला. इतक्या उन्हात लोक आमच्यासोबत चालत आहेत ते वेडे आहेत का? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Swabhimani shetkari sanghatna raju shetty on ncp sharad pawar vidhan parishad sgy