News Flash

सरकारला दीड वर्षांत मस्ती !

स्वाभिमानी, रासपची फडणवीस सरकारवर टीका; तासगावला शेतकरी मेळावा

तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे आयोजित पाणी परिषदेत बोलताना रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, व्यासपीठावर खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, प्रवक्ते महेश खराडे आदी. (छाया-इम्रान मुल्ला)

स्वाभिमानी, रासपची फडणवीस सरकारवर टीका; तासगावला शेतकरी मेळावा
कुंभमेळ्यासाठी २ हजार कोटी, नृसिंहवाडीला कन्यागत पर्वकाळासाठी १२१ कोटी देण्यास शासनाकडे पसे आहेत, उद्योजकांचे १ लाख ३४ कोटींचे कर्ज माफ करायला पसे आहेत, मात्र पाणी-पाणी म्हणून आक्रोश करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५ कोटी नाहीत का, असा सवाल करीत फडणवीस सरकारला दीड वर्षांत मस्ती आली असून असली पेशवाई राजवट शेतकऱ्यांच्या जिवावर उठली असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांनी पाणी परिषदेत केली.
तासगावजवळ मणेराजुरी येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, रासपचे महादेव जानकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आदींनी भाजपावर टीकेची झोड उठवली. पाणी-पाणी करायला लावणाऱ्या या शासनाच्या विरुद्ध एल्गार पुकारण्याचा निर्धार केला. यासाठी म्हैसाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात येत्या २१ फेब्रुवारी रोजी चक्काजाम करण्याचा निर्धार केला.
यावेळी राजू शेट्टी यांनी सरकार गरिबाचे नसल्याचे सांगत उद्योजकांना २७ बँकांची १ लाख ३२ कोटींची माफी देणारे सरकार जर ५ कोटी भरण्यास शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल तर या सरकारचा जनतेला काही उपयोग नसल्याचे सांगितले. केवळ फसवणूक करणे हाच यांचा धंदा असून सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. सिंचन योजनेत गायब झालेला पसा यांना वसूल करता येत नाही, मात्र राबणाऱ्या शेतकऱ्याचे पीक वाळत असताना तो कसा गप्प बसेल? लोकांचा उद्रेक झाला तर लाल दिवाच काय, मोटारीही पेटविल्या जातील.
पाणी योजना सुरू करण्यास आठ दिवसांचा वेळ देत २१ तारखेला चक्काजाम केले जाईल, तरीही सकारात्मक निर्णय झाला नाही तर, सांगलीला धडक देण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाईल असे खा. शेट्टी यांनी सांगितले.
यावेळी रासपचे आ. जानकर म्हणाले की, राज्यात परिवर्तन व्हावे म्हणून भाजपाला आम्ही साथ दिली. या सरकारने बहुजनांची भाषा केली. मात्र आता सत्ता मिळताच यांना मस्ती आली आहे. शेतकऱ्यांचा दुस्वास करणाऱ्यांच्या गाडय़ा फिरू देणार नाही, असा इशारा देत आम्ही चळवळीतील कार्यकत्रे आहोत, सहकार मंत्री सार्वजनिक निवडणुकीतून आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना सामान्य शेतकऱ्यांच्या दु:खाची जाणीवच नाही.
प्रदेशाध्यक्ष खोत यांनी सत्ताधारी मित्र पक्षाचा समाचार घेत सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही शरद पवार यांच्याविरुद्ध ताकद संघटित केली असताना अशांना सहकार मंत्री गुरू मानत असतील आणि भाजपा नेते बारामतीचा पाहुणचार झोडत असतील तर हे स्वाभिमानी संघटना खपवून घेणार नाही.
पाणी परिषदेचे संयोजन संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे यांनी प्रास्ताविक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2016 1:42 am

Web Title: swabhimani shetkari sanghatana comment on devendra fadnavis
Next Stories
1 विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक
2 जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांचे निधन
3 ‘यशवंतराव चव्हाण नव्या पिढीला समजण्यासाठी प्रतिष्ठानचे कार्य’
Just Now!
X