कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बार्शीकडे निघाले असताना त्यांच्या ताफ्यातील एका कारवर दगडफेक करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन टोल नाका भागात खोत यांच्या कारवर गाजरे, तूर टाकून त्यांचा निषेध केला. तसेच सदाभाऊ खोत यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. तर रिधोरे तालुका माढा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी खोत यांच्या ताफ्यातील एक कार फोडली.

सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यातील कारची तोडफोड करण्यात आली

या आंदोलन प्रकरणात आणि दगडफेक केल्याप्रकरणी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटक महावीर सावळे, सिध्देश्वर घुगे, बापू गायकवाड, सत्यवान गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत यांच्या कारवर मका, तूर, गाजर फेकण्यात आले. सदाभाऊ खोत पंढरपूरहून बार्शीकडे जाताना ही घटना घडली आहे.

सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोट्यातून भाजप सेना सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री झाले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्षच केले. इतकेच नाही तर राजू शेट्टी आणि त्यांच्यात झालेले मतभेदही महाराष्ट्राला ठाऊक आहेत. त्यामुळे त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टीही करण्यात आली. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातले संबंध विकोपाला गेले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ खोत यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. त्याचाच परिणाम आजही दिसून आला. दरम्यान या सगळ्या घटनेनंतर सदाभाऊ खोत पोलीस बंदोबस्तात बार्शी या ठिकाणी दाखल झाले असल्याची माहिती मिळते आहे.