|| दिगंबर शिंदे

बेरजेच्या राजकारणात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगली मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचा घाट घातला असून याला केवळ काँग्रेसमधील गटबाजीच कारणीभूत आहे. मोदी लाटेचा अपवादवगळता कृष्णाकाठी बहरलेल्या काँग्रेसची हाराकिरी होण्यास गटबाजीच कारणीभूत ठरत आहे. भविष्यात जिल्ह्य़ातून काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी विरोधकांची गरजच उरलेली नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

मागील निवडणुकीचा अपवाद वगळता सांगलीत काँग्रेसनेच सातत्याने वर्चस्व राखले आहे. वसंतदादांच्या सांगलीत काँग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी काथ्याकूट करावा लागत असताना आणि पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला असतानाही गटबाजी संपण्याची चिन्हे नाहीत. महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी होऊनही पक्षाला सत्तेपासून दूर जावे लागले.   लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडी करताना स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीने हातकणंगले मतदारसंघ सोडला. आता काँग्रेसच्या वाटय़ातील एक मतदारसंघ या संघटनेला हवा होता. यात वर्धा आणि सांगली या दोन मतदारसंघाबाबतची बोलणी सुरू होती. शुक्रवारी सांगली मतदार संघ स्वाभिमानीला सोडण्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनुकूल असल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाची केवळ औपचारिक घोषणा आता बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाले तर काँग्रेसची ती हाराकिरी ठरणार आहे.

एकेकाळी अन्य मतदारसंघातील उमेदवार निश्चित करणाऱ्या सांगलीची अवस्था केविलवाणी झाली आहे.  वसंतदादा पाटील यांच्यानंतर जिल्ह्य़ातील काँग्रेसचे नेतृत्व डॉ. पतंगराव कदम यांच्याकडे होते. दादा घराण्यातून या नेतृत्वाला शह देण्याचे प्रयत्न सातत्याने होत आले तरी राज्य पातळीवर कदम यांचे नेतृत्व स्वकर्तृत्वावर टिकून होते. डॉ. कदम यांच्या पश्चात मात्र काँग्रेस एकसंध ठेवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक झाले नाही याचीच परिणती आज पाहण्यास मिळत आहे.

लोकसभेसाठी प्रारंभी दादांचे वारसदार म्हणून प्रतीक पाटील यांनी उमेदवारी मागितली. शहर काँगेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली. मात्र निवडणुकीचे अर्थशास्त्र ज्ञात असलेल्यानी आमदार विश्वजित कदम यांच्या नावाचा आग्रह धरला गेला. विशाल पाटील यांनीही विधानसभेलाच प्रथम पसंती असे सांगत स्पर्धेतून स्वतला बाजूला केले. कदम आणि दादा गटाचा एकमेकांवर अविश्वास असल्याने उमेदवारी मिळाली तर विजयाची शाश्वती कोण देणार? याचे उत्तर मिळत नव्हते, यामुळेच पहले आप, पहले आप अशी स्थिती या दोन घराण्यात झाली होती.

या वादात काँग्रेसच्या श्रेष्ठींनी सुंठेवाचून खोकला घालवण्यासाठी स्वाभिमानीला हा मतदारसंघ आंदण देण्याचा विचार केला तर वावगे काय, असा प्रश्न जाणकार विचारत आहेत. याचे दूरगामी परिणाम काँग्रेसच्या राजकीय क्षितिजावर दिसणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीच्या जागेवर हक्क सांगत असताना उमेदवारीसाठी माहुलीचे माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे नाव पुढे केले आहे. त्यांचा आणि शेतकरी चळवळीचा फारसा संबंधही नाही. संघटनेची ताकदही प्रामुख्याने कृष्णा, वारणा, पंचगंगा या नदीकाठी असलेल्या ऊसपट्टय़ात आहे. लोकसभेचा मतदार हा सांगली, मिरज या दोन शहरासह दुष्काळी भागात आहे. या दुष्काळी भागाचे दुखणे पाण्याचे आहे आणि या पाण्यावरच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे राजकारण शिजत आले आहे. आता या राजकारणात दुष्काळी फोरमच्या माध्यमातून आलेले संजयकाका पाटील भाजपचे खासदार झाले, तशी स्थिती स्वाभिमानीची दिसत नसली तरी रंग चढेल तसे निवडणुकीचे रंग दिसू लागतील.