दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता पहायला मिळत असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडलं. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने जात होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केलं जात असून दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलनास सुरुवात केली.

पाहा फोटो >> दूध दर आंदोलन : लाखो लिटर दूध रस्त्यावर

दूध खरेदीच्या प्रश्नावर आज बैठक
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘करोना‘मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत. त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महानंद‘ चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.