News Flash

सोलापूरच्या विकासासाठी प्रसंगी सुशीलकुमारांचे मार्गदर्शन घेऊ

सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोठय़ा मत फरकाने निवडून आल्यानंतर स्थानिक विकास कामे करताना नवीन उद्योग प्रकल्प सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहणार असून वेळप्रसंगी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार

| May 19, 2014 02:25 am

सोलापूर लोकसभा निवडणुकीत मोठय़ा मत फरकाने निवडून आल्यानंतर स्थानिक विकास कामे करताना नवीन उद्योग प्रकल्प सुरू होण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहणार असून वेळप्रसंगी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे मार्गदर्गन घेण्यात कमीपणा मानणार नाही. शिंदे हे पराभूत झाल्यामुळे सोलापूर दहा वर्षे मागे पडण्याची व्यक्त केली जाणारी भीती खोटी ठरवूच, नव्हे तर सोलापूरला १५ वर्षे पुढे नेऊ, असा मनोदय भाजपचे नवनिर्वाचित खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी बोलून दाखविला आहे.
सोलापुरात काँग्रेसचे बलाढय़ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव करून नवा इतिहास घडविणारे भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना यापुढे सुरुवातीला आठवडय़ातून तीन दिवस सोलापूर मतदारसंघात थांबण्याचे व नंतर पुढे मुंबईतील व्यवसाय थांबवून पूर्ण वेळ सोलापूरसाठी देण्याचे जाहीर केले. मतदारसंघातील गावांमध्ये पायी फिरून रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषत: मतदारसंघात मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न अग्रहक्काने सोडविण्याच्या दृष्टीने प्रथमत: नंदेश्वर येथे पाणी परिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करून निवडून आल्याचा एकीकडे अत्यानंद वाटत असताना दुसरीकडे नव्या जबाबदारीचे भानही आल्याचे नमूद करीत अ‍ॅड. बनसोडे यांनी, एमआयडीसीतील बंद पडलेले उद्योग रोजगारासाठी पुन्हा सुरू करणे व नवे उद्योग आणणे, सुशीलकुमार शिंदे यांनी मंजूर करून आणलेले केंद्र सरकारचे प्रकल्प पूर्ण करणे, तसेच सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १४४१ कोटींचे प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी भाजपचे अक्कलकोटचे आमदार सिद्रामप्पा पाटील हे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:25 am

Web Title: take guidance to sushilkumar shinde for development of solapur
टॅग : Sushilkumar Shinde
Next Stories
1 ‘नांदेडच्या संभाव्य पोटनिवडणुकीतील विजय आमचाच’!
2 ग्रेस यांची कविता ओंजळीतील पाण्याप्रमाणे- वारूंजीकर
3 पंजाबचे राज्यपाल चाकूरकर राजीनामा देणार?
Just Now!
X