दिगंबर शिंदे

पुण्यासह पाच जिल्ह्य़ांचा समावेश असलेल्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तीनही राजकीय पक्षांचे उमेदवार सांगली जिल्ह्य़ातीलच असून दिवाळीनंतर फटाके कोणाच्या अंगणात धमाके करणार याकडे राजकीय निरीक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत सत्ताधारी आघाडी एकसंध आहे की फुटीरतेला वाव आहे, या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालानंतर मिळेल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरची उमेदवारी देताना प्रथमच रा. स्व. संघाबाहेरील व्यक्तीला संधी दिली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी कडेगावच्या देशमुख वाडय़ावरील संग्राम देशमुख यांना मैदानात उतरवताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुंडलच्या अरुण लाड यांनाच उमेदवारी मिळेल हे गृहीत धरून राजकीय पटलावर डावासाठी पत्ते टाकले आहेत.

प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या अरुण लाड यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्य़ातीलच पक्षाचा पदाधिकारी विजयी व्हावा यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तर जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील हे स्वत: उमेदवार आहेत. यामुळे या निवडणुकीमध्ये तीन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची कसोटी लागली आहे.

राज्यात सत्तांतरानंतर राजकीय ताकद अजमावण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांच्या पाठीशी संपूर्ण ताकद लावली असली तरी मतदारसंघाचा विस्तृत भाग पाहता सत्ताधारी आघाडीला ही निवडणूक जशी कठीण आहे तशीच भाजपलाही कठीण आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात भाजपची वाढती ताकद आयारामांच्या जिवावरच बेतली आहे. जुने ऋणानुबंध प्रत्येकाचे आहेत. दूर कशाला भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांच्यात मैत्रीचे घट्ट नाते आहे. देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना लाड हे राष्ट्रवादीचे गटनेते होते. मात्र पक्षीय पातळीवर विरोधकाची भूमिका निभावताना मैत्रीत कुठेही मिठाचा खडा पडणार नाही, याची दक्षता दोघांनीही घेतली होती.

पलूस-कडेगाव हे दोन तालुके आजही घाटावरील आणि घाटाखालील हा सूक्ष्म भेद करीत आले आहेत. राजकीय पक्षांनी आतापर्यंत स्व. पतंगराव कदम आणि देशमुख यांनाच सत्तास्थाने दिली. यामुळे स्वातंत्र्य चळवळीपासून समाजकारण, राजकारणात कार्यरत असलेल्या लाड कुटुंबाला सत्तेपासून अलिप्तच राहावे लागले. विधानसभा निवडणुकी वेळी या गटाच्या ताकदीवर अनेक तडजोडी राजकीय वैरत्व असलेल्या कदम, देशमुख गटाकडून झाले. मात्र व्रतस्थ भूमिका घेतलेल्या लाड कुटुंबाने खळखळ न करता राजकीय वाटचाल सुरूच ठेवली आहे. आता या निवडणुकीमध्ये मागील पैरा कसा फेडला जातो हे पाहणे रंजक असणार आहे.

भारती विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था या संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीमध्ये पदवीधर मतदार नोंदणीही या संस्थातील नोकरदारांची लक्षणीय असल्याने हे मतदार निर्णायक ठरणार आहे.

भारती विद्यापीठाची सूत्रे राज्यमंत्री तथा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे आहेत. यामुळे त्यांच्या भूमिकेला या वेळी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणे स्वाभाविकच आहे. मात्र पतंगराव कदम यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकी वेळी देशमुख यांची माघार हा पैरा फेडला जाणार का? हाही कळीचा मुद्दा आहे. त्याचबरोबर राज्यमंत्री कदम यांना आता कॅबिनेटचे वेध लागले आहेत. हे ईप्सित साध्य करण्यासाठी आघाडी धर्माचे पालन करायचे की पैरा फेडण्याच्या नादात महत्त्वाकांक्षेला खीळ घालायची याचा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे.

स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडलमध्ये पुरोगामी विचारांचा जागर करणाऱ्या लाड कुटुंबामध्ये या वेळी पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांना गेल्या वेळीही पक्षाची उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत होती. त्यामुळे त्यांनी मतदार नोंदणीपासूनच तयारी केली होती. मात्र राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी सारंग पाटील यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली.

लाड यांच्या बंडखोरीमुळे भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय सुकर झाला होता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपला पहिल्या पसंतीची ५१ हजार ७११, राष्ट्रवादीला ४४ हजार ७७० मते मिळाली होती, तर बंडखोरी करून अपक्ष मैदानात उतरलेल्या लाड यांना ३२ हजार ८७६ मते मिळाली होती. मतविभाजनामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता.