ठाकरे-पवार पॅटर्न भाजपाला आव्हान ठरणार असं वक्तव्य भाजपाचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी केलं आहे. एवढंच नाही तर आगामी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक यासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने मोट बांधल्याचा दावाही संजय काकडे यांनी केला आहे. ठाकरे-पवार युतीचा नवा पॅटर्न भाजपासमोर मोठं आव्हान उभं करु शकतो. भाजपाने वेळीच सावध होणं आवश्यक आहे असाही सल्ला संजय काकडे यांनी दिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना १७, राष्ट्रवादी काँग्रेस १६ आणि काँग्रेस १५ असं जागावाटपाचं सूत्र ठरल्याचीही चर्चा झाल्याचाही खुलासा काकडे यांनी केली. संजय काकडे यांच्या मते महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर करणे पक्षांतर करण्याच्या तयारीत असलेल्या काठावरच्या आमदारांना सूचक इशारा देण्यासाठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी होऊ घातली आहे. यामुळे मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ज्या पक्षांची ताकद आहे त्यांना बळ देऊन भाजपाचा सफाया करण्याची रणनीती आखली जाण्याची तयारी आहे असंही संजय काकडे यांनी म्हटलं आहे.

संजय काकडे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपाचे सहयोगी खासदार झाले. मध्यंतरीच्या काळात संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशीही चर्चा होती. पण देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन ते भाजपातच राहिले. मात्र त्यांनी यापूर्वीही अशी खळबळजनक वक्तव्यं केली आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपाला सतर्क राहण्यास सांगितलं आहे.