आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग संदर्भातील अहवलावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच रंगले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्योरोप सुरू आहेत. आता या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज(शनिवार) माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, फोन टॅपिंगचा रिपोर्ट नवाब मलिका यांनीच फोडला असल्याचंही यावेळी त्यांनी बोलून दाखवलं.

नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणाने झाली आहे, तेवढी कुठल्याही दुसऱ्या प्रकरणाने झालेली नाही. मला माहिती आहे नवाब मलिक का चिंतेत आहेत?, कारण त्यांना हे माहिती आहे की, फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झालेला आहे. त्यामुळे अनेक लोकांचं बिंग फुटतं आहे. मी त्या दिवशी देखील सांगितलं की, महाराष्ट्र पोलिसांची बदनामाी करण्याचा जो काही प्रकार आहे. त्यामध्ये खरंतर हा रिपोर्ट नवाब मलिक यांनींच फोडला. मी पहिली दोन पानंच दिली होती. पण मी हा सवाल विचारू इच्छितो, की सिंडिकेट राज चालवल्याने, बदल्यांमध्ये पैसे खालल्याने, दलाली केल्याने आणि वाझे सारख्या लोकांना सेवेत घेऊन त्यांच्या माध्यमातून सिंडिकेट राज चालवल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाली की महाराष्ट्र पोलिसांचं नावं झालं? आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे सगळे वाझेचे मालक आहेत, ते आज चिंतेत आहेत.”

तसचे, “नवाब मलिक व त्यांचे सर्व सहकारी घाबरलेले आहेत, की वाझे आता काय काय बोलतील? जेवढे वाझेचे मालक आहेत ते सर्वच्या सर्व घाबरलेले आहेत की, आता कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर येतील? कारण की ज्या प्रकारे गोष्टी समोर येत आहेत. यावरून हे लक्षात येतं, की एकप्रकारचे सिंडेकेट राज सुरू होतं. मुंबई व महाराष्ट्र पोलिसांची बदनामी आम्ही नाही केली. ज्यांनी हे सिंडिकेट राज चालवलं, ज्यांनी १७ वर्षांनंतर वाझेला नियमाबाहेर असतानाही महत्वाचं पद दिलं आणि ज्यांनी सर्वच्या सर्व केसेस वाझेकडे दिली व मुंबई पोलीस ज्यांचं नाव स्कॉटलॅण्ड यार्ड पोलिसांपेक्षाही चांगलं होतं, त्याला बदनाम करण्याचं काम केलं, आता तेच प्रश्न विचारत आहेत. अगोदर स्वतःकडे वाकून पाहा मी समजू शकतो, तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही आमच्यावर कितीही आरोप लावा, आम्हाला काही चिंता नाही.” असं देखील यावेळी फडणीस यांनी बोलून दाखवलं.