News Flash

धक्कादायक: करोनाबाधिताकडून रुग्णवाहिका चालकास मारहाण, अंगावरही थुंकला

मालेगावमधील संतापजनक प्रकार, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संग्रहित छायाचित्र

इच्छित रुग्णालयात दाखल करण्यास नकार देणाऱ्या रुग्णवाहिका चालकास एका करोनाबाधित रुग्णाकडून मारहाण करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे  हा रुग्ण  रुग्णवाहिका चालकाच्या अंगावरही थुंकल्याचा संतापजनक प्रकार मालेगावमध्ये घडला आहे.

शहरातील मनमाड चौफुली भागात असलेले जीवन हॉस्पिटल व मन्सूरा युनानी काॅलेजचे रुग्णालय या दोन ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी महापालिकेतर्फे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. येथील सामान्य रुग्णालयात दाखल असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना सोयीनुसार वरील दोन्ही रुग्णालयांमध्ये हलविण्यात येत आहे. त्याप्रमाणे बुधवारी सायंकाळी एका करोनाबाधित रुग्णाला महापालिकेच्या रुग्णवाहिकेतून जीवन हॉस्पिटलला नेण्यात आले. त्यास आक्षेप घेऊन जीवन ऐवजी आपल्याला मन्सूरा रुग्णालयात दाखल करावे असा आग्रह या रुग्णाने चालकाकडे धरला. रुग्णालयीन प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या बाहेर जाता येणार नाही असे सांगत चालकाने त्यास नकार दिल्याने संतापलेल्या रुग्णाची चालकाला दमबाजी करत मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता चालकाच्या अंगावरही हा रुग्ण  थुंकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

करोनासारख्या महामारीच्या संकटात रात्रंदिवस जोखीम पत्करून सेवा देणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यावर आलेल्या या प्रसंगामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी जीवन हॉस्पिटलसह अन्य रुग्णालयांमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकाराची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून संबंधित रुग्णाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजार ८१ झाली आहे. राज्यातील ११ जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. शिवाय ३ जिल्ह्यांतील काही भाग हे करोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. लॉकडाउननंतरही अद्याप राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येतील वाढ थांबत नाही, ही चिंतेची बाब मानली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 5:16 pm

Web Title: the ambulance driver was beaten and spit on his body by a corona affected person msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ, आणखी तीन जण करोनाबाधित
2 …संविधानाला श्रद्धांजली वाहण्याची तयारी नसेल ना?; पंतप्रधान, राष्ट्रपतींच्या ट्विटवर राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल
3 नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांचं थर्मल स्क्रिनिंग होणार; एकनाथ शिंदेंचे आदेश
Just Now!
X