सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीसह नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान वाढले असून यात करमाळा तालुक्यात जेऊरजवळ रस्त्याच्या पुलावरून पाण्याचा लोंढ्यात खासगी मोटार वाहून गेली. यात चालकासह तिघांचे बळी गेले.या दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशी तिन्ही मृतदेहांसह मोटार पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. राहुल नवनाथ टोणपे (वय २७, मूळ रा. झरे, ता. करमाळा, सध्या रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव, ता. मुळशी, जि. पुणे) या मोटारचालकासह मोटारीतील प्रवासी गजानन सदाशिव वैयकर (वय ७२, मूळ रा. वदशिवणे, ता. करमाळा, सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे) आणि त्यांचा मुलगा सचिन वैयकर (वय ३८) अशी  मृतांची नावे आहेत. जेऊर ते लव्हे गावच्या रस्त्याच्या पुलावर दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीने पाण्याचा लोंढा आल्याने त्यात मोटार वाहून गेली होती.

राहुल टोणपे याचे वडील नवनाथ जगन्नाथ टोणपे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार त्यांचा मुलगा राहुल याने चार वर्षापूर्वी स्विफ्ट डिझायर मोटार (एमएच १४ एफसी ३९७०) विकत घेतली होती. या मोटारीच्या माध्यमातून तो प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करायचा. गेल्या बुधवारी सकाळी राहुल हा पुण्यातून प्रवासी भाडे घेऊन करमाळा तालुक्यात गेला होता. त्या दिवशी दुपारनंतर कुटुंबीयांशी त्याचा संपर्क तुटला. त्यामुळे वडील नवनाथ टोणपे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलीस ठाण्यात मुलगा राहुल स्वतःच्या मोटारीसह बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान, टोणपे यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथील नातेवाईक शिवाजी कदम यांच्याशी संपर्क साधून मुलाबाबत चौकशी केली केली. त्यावेळी जेऊर ते लव्हे रस्त्याच्या पुलावर पाण्याच्या लोंढ्यात मोटार वाहून गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे मुलाच्या काळजीने नवनाथ टोणपे हे तातडीने जेऊर येथे येऊन मुलाचा शोध घेतला असता तेथील पुलाखालील पाण्यातून राहुलची मोटार पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढली. त्याच मोटारीत राहुलसह वैयकर पिता-पुत्राचेही मृतदेह सापडले.
.