News Flash

तापमान वाढल्याने राज्यात विक्रमी वीज मागणी!

सध्या तरी वीज कपातीचे कोणतेही सावट राज्यावर नसल्याचे दिसते आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

तापमान वाढल्याने राज्यात विक्रमी वीज मागणी!

राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ ते ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी (३० मार्च) महावितरण कंपनीकडून पुरविण्यात येणाऱ्या विजेच्या मागणीने १९ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला. औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात अद्यापही काही प्रमाणात कोळशाचा पुरवठा कमी असला, तरी इतर प्रकल्पांची क्षमता वाढवून त्याचप्रमाणे खुल्या बाजारातील वीज खरेदीचे प्रमाण वाढवून विजेची वाढीव मागणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी वीज कपातीचे कोणतेही सावट राज्यावर नसल्याचे दिसते आहे.

मार्चच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीपासूनच विजेच्या मागणीत सातत्याने वाढ नोंदविली गेली. राज्यात सरासरी विजेची मागणी १६ ते १७ हजार मेगावॉटपर्यंत असते. किमान तापमानाचा पारा ३५ ते ३७ अंशावर असताना १ मार्चला १८ हजार ३०० मेगावॉट, तर १२ मार्चला १८ हजार ७०० मेगावॉटपर्यंत विजेची मागणी पोहोचली होती. त्यानंतर राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने मागणीत घट झाली होती. मात्र, मागील तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत उषणतेची लाट आली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ ते ४० अंशावर गेला आहे. परिणामी शुक्रवारी विजेची मागणी तब्बल १९ हजार ७८ मेगावॉट इतकी नोंदवली गेली. या मागणीमुळे पहिल्यांदाच १९ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला गेला. शुक्रवारी शासकीय सुटी असल्याने बहुतांश कार्यालये बंद असतानाही मोठी मागणी नोंदविली गेली. उन्हाचा पारा असाच कायम राहिल्यास कामकाजाच्या दिवशी वीज मागणीत आणखी वाढीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वाढती मागणी लक्षात घेता सध्या खुल्या बाजारातून वीज खरेदी वाढविण्यात आली आहे. सुमारे पाचशे मेगावॉटपर्यंत सरासरी खरेदी असताना सद्यस्थितीत सुमारे दोन हजार मेगावॉट विजेची खुल्या बाजारातून खरेदी करण्यात येत आहे. त्यात अल्प मुदतीच्या करारानुसार ६५५, तर पॉवर एक्स्चेंजमधून १३०० मेगावॉट वीज खरेदी होत आहे. सध्या औष्णिक केंद्रातून वीजनिर्मितीच्या क्षमतेत काहीशी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूर, पारस, परळी, भुसावळ आदी केंद्रांतून क्षमतेच्या आसपास वीजनिर्मिती केली जात आहे. वीजनिर्मिती केंद्राची क्षमता वाढ आणि खासगी बाजारातून आवश्यकतेप्रमाणे वीज खरेदी करून सध्या तरी वाढलेली मागणी पूर्ण करण्यात येत आहे.

कोळशाचे सावट कायम; जलविद्युतवर नियंत्रण

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात निर्माण झालेल्या कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे राज्यात विजेचे संकट निर्माण झाले होते. त्या वेळी वीजकपात करावी लागली होती. कोळसा टंचाईचे हे सावट अद्यापही दूर झालेले नाही. खासगी प्रकल्पांसह महानिर्मिती कंपनीचे खापरखेडा, कोरडी, नाशिक आदी प्रकल्पातील वीजनिर्मिती संच अद्यापही कोळशाच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे बंद आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणी वाचविण्याच्या दृष्टीने जलविद्युत प्रकल्पांवरही नियंत्रण आणण्यात आले आहे. १९२० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता असलेल्या कोयना प्रकल्पातून सध्या सातशे मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2018 5:14 am

Web Title: the demand of electricity is increased due to the temperature hike
Next Stories
1 विकासाच्या निर्णयामध्ये आमदारांना डावलले जाते
2 खासदार सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित
3 ३३ वर्षांत वाहतुकीचे २३ आराखडे पिंपरी
Just Now!
X