सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारलं जाणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे हे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारलं जाईल. त्यासाठी ताज ग्रुपच्या मे. इंडियन हॉटेल्स कंपनीला भाडेपट्ट्याने जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

वेंगुर्ला तालुक्यातील मौजे शिरोडा वेळागर येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्यासाठी ताज ग्रुपच्या मे. इंडियन हॉटेल्स कंपनीला ५४.४० हेक्टर जमीन ९० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टय़ाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने भूसंपादित केलेली जमीन दीर्घ भाडेपट्टय़ाने इंडियन हॉटेल्स कंपनीला देण्यात येईल.

याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाच्या नावात बदल करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या नावात बदल करुन ते आता ‘पर्यावरणीय व वातावरणीय विभाग’ असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री समजंय बनसोडे यांनी नावात बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. फक्त त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.