करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये १० ते १८ जुलै दरम्यान कडकडीत लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील जिल्ह्यात दररोज नवीन करोनाबाधित रुग्ण आढळतच आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या अद्यापही, औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १० हजार ५३८ झाली आहे.

आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १३४ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. जिल्ह्यात आढळलेल्या एकूण १० हजार ५३८ करोनाबाधितांपैकी ५ हजार ९८६ जणांनी करोनावर मात केलेली आहे. सध्या ४ हजार १६० जणांवर उपाचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे.

आज आढळलेल्या १३४ नव्या करोनाबाधितांमध्ये औरंगाबाद शहर हद्दीतील १३ व ग्रामीण भागातील २२ रुग्णांचा समावेश आहे. तर सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास ८५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

दहा दिवसांपूर्वी शहरातील वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेता संपूर्ण टाळेबंदी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्त व लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता. या काळात मोठय़ा प्रमाणात जलदगती चाचण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले. औरंगाबाद शहरातील मृत्युदर मे महिन्यात २.०२ वरून जूनमध्ये थेट ५.६१ वर गेला होता. योग्य रीतीने रुग्णांचे केलेले व्यवस्थापन आणि व्याधी जटिल बनण्यापूर्वी केलेल्या उपाययोजनामुळे मृत्यू कमी झाल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला आहे.