उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची ताकद आम्हाला भारी पडली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली, ते पंढरपुरात बोलत होते. जुन्या नेत्यांना लोक आता कंटाळले असून त्यांनी स्वतःहून मागे होऊन नव्या नेत्यांना संधी द्यावी, तरच लोक स्विकारतील असेही पवार यांनी म्हटले आहे.

पवार म्हणाले, आजच्य निकालावरून हे कळते की लोक आता किती दिवस जुन्या नेत्यांना स्विकारत राहतील. त्यापेक्षा नव्या नेत्यांना संधी द्या, तरच लोक आपल्याला स्विकारतील.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांनी ७६ मतांनी विजयी मिळवला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक जगदाळे पराभूत झाले आहेत. एकूण १००३ मतांपैकी धस यांना ५२७ तर जगदाळे यांना ४५१ मते मिळाली, तर २५ मते बाद ठरवण्यात आली.

बीड नगर परिषदेच्या दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकला म्हणून राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी १० नगरसेवकांना अपात्र ठरविले होते. हे आदेश रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यामुळे ही निवडणूक वाद्याच्या भोवऱ्यात अडकली होती. मतमोजणीही पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या अपात्र नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग मोकळा झाला होता.