वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सामान्यांना वाढीव वीज बिलातून थेट दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात न आल्याने, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानुसार प्रदेश भाजपाकडून आज (२३ नोव्हेंबर) राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन केलं जात आहे.

तर, ”ये तो बस झांकी है, आगे और लढाई बाकी है!..जो पर्यंत सरकार वाढीव वीज बिल सुधारीत करून देत नाही. तोपर्यंत भाजपा असंच आंदोलन करत राहणार.” असा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला इशारा दिला आहे.

”जोपर्यंत राज्य सरकार वीज बिलांमध्ये सवलत देत नाही, तोपर्यंत भाजपाचा संघर्ष सुरूच राहणार आहे. राज्यकर्त्यांचेच एकमेकांशी वादविवाद आहेत, त्यात जनतेची यांना कसलीही काळजी नाही. त्यामुळे आज विल बिलांची होळी करून या नाकर्त्या राज्य सरकारला वठणीवर आणणारच!” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

आज महाआघाडी सरकारच्या विरोधात वाढीव वीज बिलांमध्ये सवलती मिळवण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, डॉ. अतुलबाबा भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथजी बागडी यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथील दत्त चौक येथे वीज बिल होळी आंदोलन करण्यात आले.

”करोनाच्या कठीण काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेली असतानाच वाढीव वीज बिलांमुळे सर्व सामान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. त्यात माजलेल्या सरकारने वीज बिल माफ करणार नाही असं म्हटलंय. त्यांचा हाच माज उतरवण्यासाठी जनतेच्या हितार्थ वीजबिल सवलतीसाठी भाजपाने वीजबिल होळी आंदोलन पुकारलं आहे.” असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.