28 September 2020

News Flash

वर्धा : निवारागृहातून गावी निघालेल्या मजूर महिलांना शिक्षक संघटनेकडून साडीचोळी देऊन निरोप

महिलांना अश्रू अनावर झाल्याचे भावविभोर चित्र वर्धा येथे पाहायला मिळाले.

वर्धा : लॉकडाउनमुळं अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील मजूर महिलांची निवारा गृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनानं प्रवासाला परवानगी दिल्यानंतर त्या आता आपल्या गावी निघाल्या आहेत. या महिलांना शिक्षक संघटनेकडून साडीचोळी देऊन निरोप देण्यात आला.

प्रशांत देशमुख

निवारा गृहात पाच आठवडे सांभाळल्यानंतर आज काही परप्रांतीय महिलांना साडीचोळी देवून शिक्षकांनी निरोप दिल्यावर महिलांना अश्रू अनावर झाल्याचे भावविभोर चित्र वर्धा येथे पाहायला मिळाले.

येथील न्यू इंग्लिश शाळेच्या निवारागृहात वाटेत अडकलेल्या मध्यप्रदेशच्या काही महिला मजुरांना थांबविण्यात आले होते. तसेच इतरही ९० मजूर होते. त्या सर्वांच्या दोन्ही वेळचं जेवण व चहा नाश्त्याची व्यवस्था राज्य शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली होती. त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने टप्याटप्याने त्यांना त्यांच्या प्रांतात सोडले जात आहे. आज दहा महिलांची निरोपाची वेळ होती. ३५ दिवस एकत्र राहल्याने शिक्षक व मजूर कुटूंब यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. त्याचा प्रत्यय आज आला.

ज्येष्ठ शिक्षक नेते अनिल टोपले यांच्या पुढाकाराने सर्व महिला व मुलींना साडीचोळी देण्यात आली. आपली भावना व्यक्त करतांना एक महिला म्हणाली की, देवदूतासारखे आमच्या मदतीला शिक्षक लोक आले. आमच्या कुटूंबीयांनीसुध्दा लावला नसेल एवढा जीव तुम्ही लोकांनी लावला. कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. ही आठवण कायमची राहील. तर दुसऱ्या एका महिलेने आई-वडील नसल्याचे सांगत इतके दिवस जपणाऱ्या शिक्षक शिक्षिकाच आमच्यासाठी आईवडिलांसमान ठरल्या, त्यांनीच आम्हाला मुलीप्रमाणेच सांभाळले. जेवणच नव्हे तर प्रेमही दिल्याचे मत व्यक्त केले.

मुक्कामी असतांना या सर्वांना विरंगुळा म्हणून भजन, गायन व अन्य उपक्रमाचे आयोजन शिक्षकांनी केले होते. संघटना नेते अजय भोयर यांच्या मार्गदर्शनात मुकेश इंगोले, संजय बारी, सुनील गायकवाड, प्रशांत चौधरी, जयश्री पाटील, संध्या देशमुख, सरिता मुळे, पंकजा गादेवार आदी शिक्षकांनी पाळीपाळीने या मजुरांची व्यवस्था सांभाळीली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 6:43 pm

Web Title: the teachers union gives send off to the women laborers who was stay in shelter home aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी काय करायचं?; तज्ज्ञगटाचा अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीकडे सादर
2 “त्या प्रश्नाचं उत्तर हे असं मिळाले वाटलं नव्हतं”; मनसेने त्या मजुरांना वाहिली श्रद्धांजली
3 विधान परिषद उमेदवारांच्या निवडीवर खडसेंनी सोडलं मौन; मोदी यांच्या सभांवर बहिष्कार टाकणाऱ्यांना संधी
Just Now!
X