निखील मेस्त्री

समूहाच्या माध्यमातून रुग्णांना खाटा मिळवून देण्याचे काम

पालघर : पालघर जिल्ह्यत करोनाची स्थिती भयावह झालेली असताना बाधित आणि अस्वस्थ रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नाहीत. रुग्ण मदतीसाठी उभारण्यात आलेला शासकीय जिल्हा डॅशबोर्ड व मदतकक्ष कुचकामी ठरत असताना समाजमाध्यमांच्या समूहातून अशा रुग्णांना मिळत असलेली मदत वरदान ठरत आहे.

पालघर जिल्ह्यतील बहुतांश शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायू तसेच अतिदक्षता खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यातच अशा रुग्णांच्या मदतीसाठी जिल्ह्यने उभारलेला डॅशबोर्डही कामी येत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. अशा रुग्णांची हेळसांड लक्षात घेत पालघरमधील काही तरुणांनी एकत्र येत समाजमाध्यमावर एक समूह तयार करून त्या समूहाद्वारे रुग्णांसाठी मदत कक्ष स्थापन केला आहे. या समाजमाध्यम समूह मदत कक्षाद्वारे दररोज पाच ते दहा रुग्णांना प्राणवायू अतिदक्षता व कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या खाटा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या समूहातील सदस्यांनी जिल्ह्यतील व त्याबाहेरील विविध रुग्णालयांचे संपर्क क्रमांक जतन करून ठेवले असून जिल्ह्यत तसेच जिल्ह्यबाहेरील रुग्णालयात खाटा यांची माहिती हा समूह घेत आहे. ज्या रुग्णाला खाटांची आवश्यकता आहे, अशा रुग्णांची माहिती समाजमाध्यमांद्वारे या समूहावर टाकण्यात येते.  समूहाला दिवसाला सुमारे ३० रुग्णांच्या नातेवाईकांचे खाटांसाठी चौकशी येत आहे. यातील काही रुग्ण जिल्ह्यबाहेरीलही आहेत. या समूहाने आजतागायत शेकडो रुग्णांसाठी शासकीय व खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत.

मदतीचा हात देणारे ‘समूह’

अन्नापासून ते औषधांपर्यंतची  मदत या समूहांनी  दिली आहे. पालघर येथे जे. जे. इमारतीत नव्याने स्थापन झालेल्या काळजी केंद्रालाही ते उभारताना अशाच अनेकांनी मदतीचा हात दिल्याने कमी दिवसात हे केंद्र उभे राहिले. आताही येथे काहीजण रुग्णांच्या मदतीसाठी उभे असतात.

गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांची हेळसांड होताना पाहून त्यांना मदत व्हावी यासाठी समूह स्थापन केला. या समूहातून अनेकांना मदत होत असल्याचे समाधान आहे.

– डायमंडसिंग चड्डा,  व्यवस्थापक, कोव्हीड हेल्पलाइन समूह