राज्यातील करोनाचा संसर्ग आता अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सारख्या प्रमुख शहरांबरोबर विदर्भातील शहरांमध्येही दररोजच मोठ्या संख्येने करोना रुग्ण आढळून येत आहे. शिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यातील लशीकरणाचा वेग वाढवण्याची आवश्यकता दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी, “खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी”. अशी मागणी केली आहे.

“ पुण्यातील ‘सीरम’ तसेच हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ मध्ये करोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा.” असं आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

अधिवेशन टाळण्यासाठी ठाकरे सरकार करोनाचे आकडे वाढवून सांगत आहे का?; मनसेने उपस्थित केली शंका

दरम्यान, प्रसारमाध्यमेही करोनाची आकडेवारी तपासून पाहत नाही. सरकारडून आलेली आकडेवारी देतात. आता अधिवेशन काळामध्ये मोर्चे घेऊन अनेकजण सरकारकडे आपली मागणी मांडतात. मात्र राजकीय मोर्चांवर बंदी घालून आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. केवळ अधिवेशन टाळण्यासाठी करोना वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे असा आरोपही देशपांडेंनी केला आहे.