27 February 2021

News Flash

“कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती”

पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही कोरेगाव भीमाची लढाई जिंकलं नाही, संशोधक चंद्रकांत पाटील यांची साक्ष

जयस्तंभाशी संबंधित इतिहासाचा अभ्यास करत असून खरा इतिहास व छापून आलेला इतिहास यात प्रचंड तफावत असल्याचे इतिहास संशोधक चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे

1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा लढाईच्यावेळी महार रेजिमेंटच नव्हती, पेशवे किंवा इंग्रज यांच्यापैकी कुणीही ही लढाई जिंकलं अथवा हरलं नाही अशी गोप्यस्फोट करणारी माहिती इतिहास संशोधक चंद्रकांत शामराव पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी समितीपुढे बुधवारी मांडली आहे. पाटील यांनी पुरावा म्हणून शेकडो पानांसह प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कोलकाता हायकोर्टाचे माजी सरन्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीपुढे सुनावणी सुरू आहे.

कोरेगाव भीमाची लढाई बडोद्याच्या गायकवाडांचे मंत्री गंगाधर शास्त्री पटवर्धन यांची हत्या दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांनी घडवल्यावरून झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. ही लढाई कुठल्याही जाती वा धर्माशी संबंधित नव्हती असे सांगतानाच पाटील यांनी प्रसारमाध्यमांमध्ये आलेली 500 महार व पेशव्यांचे 28 हजार सैनिक यांच्यात झाल्याची माहिती संशयास्पद असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. महार रेजिमेंटची स्थापना 1941 साली झाली, त्यामुळे त्यांचा 1818च्या लढाईत सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा पाटील यांनी केला आहे.

गेले पाच महिने आपण जयस्तंभाशी संबंधित इतिहासाचा अभ्यास करत असून खरा इतिहास व छापून आलेला इतिहास यात प्रचंड तफावत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे. कोरेगाव भीमाच्या लढाईची 200 वर्ष साजरा करताना इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. ब्रिटिशांनी लिहिलेले ग्रंथ तसेच मुंबई व पुण्याची अर्काइव्ह व अन्य स्त्रोतांचा अभ्यास आपण केल्याची साक्ष पाटील यांनी दिली आहे. महसुलाच्या वसुलीवरून पेशव्यांशी असलेले वाद मिटवण्यासाठी ब्रिटिशांच्या मध्यस्थीनंतर बडोद्याच्या गायकवाडांनी गंगाधर शास्त्री यांना पुण्याला पाठवले होते. परंतु 14 जुलै 1815 रोजी त्रिंबकजी डेंगळे व त्यांच्या माणसांनी शास्त्रींची हत्या केली, असा दावा पाटील यांनी केला. ब्रिटिशांच्या चौकशीत डेंगळे व त्यांचे दोन सहकारी दोषी आढळले. ब्रिटिशांच्या मागणीवरून पेशव्यांनी डेंगळ्यांना त्यांच्या हवाली केले. डेंगळ्यांना ठाण्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले, परंतु तिथून सुटका करून घेत डेंगळ्यांनी साताऱ्याजवळच्या फलटणमध्ये ब्रिटिशविरोधी फौज उभी केली. पेशव्यांकडून मिळालेल्या निधीच्या बळावर जमा केलेल्या या सैन्यामध्ये भिल्ल, मांग, रामोशी, मराठा व अन्यांचा समावेश होता असा दाखला पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान पेशव्यांनी ब्रिटिशांच्या एलफिन्स्टन यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली परंतु एलफिन्स्टन निसटला. ब्रिटिशांच्या ऐतिहासिक कागदपत्रांनुसार 5 नोव्हेंबर 1817 च्या या घटनेनंतर ब्रिटिश सैन्यानं पेशव्यांचा पाठलाग केला. 31 डिसेंबर 2017 रोजी कोरेगावजवळ ब्रिटिशांचं सैन्य व मुख्यत: अरबांचा समावेश असलेलं पैशव्यांचं सैन्य यांच्यात लढाई झाली. पेशव्यांचे 500 चर ब्रिटिशांचे 111 सैनिक ठार झाले. एक जानेवारी रोजी पेशवे सैन्यासह साताऱ्याला गेले तर ब्रिटिश शिरूरच्या छावणीत गेले व कुठलंही सैन्य जिंकलं अथवा हरलं नाही असा दावा पाटील यांनी केला आहे.

त्यानंतर अनेक महिन्यांनी जून 1818 मध्ये पेशव्यांनी ब्रिटिशांपुढे शरणागती पत्करल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. ब्रिटिश सैन्याच्या पराक्रमाबद्दल जयस्तंभ उभारण्याचा ब्रिटिशांचा पत्रव्यवहारही पाटील यांनी सादर केला असून जयस्तंभाच्या देखभालीसाठी खादोजी मालोजी जामदार यांची नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव येथील हिंसाचारप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाकडून बुधवारपासून साक्षी नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या जिल्हा परिषदेत आयोगाला कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून सहा ऑक्टोबपर्यंत सतरा प्रतिज्ञापत्रांवर सुनावणी होणार आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाने मे महिन्यात भीमा कोरेगाव, पेरणेफाटा, वढू-बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला होता. चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी विहित मुदतीमध्ये दाखल प्रतिज्ञापत्रांपैकी सतरा अर्जावर सहा ऑक्टोबपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. उर्वरित अर्जावर पुढील टप्प्यामध्ये सुनावणी घेण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, बुधवारी नियोजनाप्रमाणे कामकाजाला सुरूवात झाली. त्यानुसार इतिहासावर संशोधन करत असलेले चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे आयोगापुढे सादर केले. गुरूवारी पाटील यांची उलटतपासणी होणार आहे. दररोज चार-पाच जणांची साक्ष नोंदविण्याचे नियोजन आयोगाकडून करण्यात आले आहे. प्राप्त अर्जावर १० ऑक्टोबपर्यंत सुनावणी घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु, तोपर्यंत साक्षी नोंदवणे, तसेच सुनावणी पूर्ण न झाल्यास शासनाकडून आयोगाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 3:21 pm

Web Title: there was no mahar regiment during koregaon bheema war
Next Stories
1 धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्याने पोटच्या मुलीवर केला बलात्कार
2 तनुश्रीने माध्यमांऐवजी आधी पोलिसांकडे तक्रार करावी: गृहराज्यमंत्री केसरकर
3 तनुश्री दत्ताविरोधात बीडमध्ये अदखलपात्र गुन्हा
Just Now!
X