वर्धेचे पालकमंत्री सुनील केदार यांची माहिती

वर्धा : वर्धा जिल्हय़ासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची करोना रुग्णासाठी सेवा घेण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका पालकमंत्री सुनील केदार यांनी मांडली.

महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर आयोजित आढावा बैठकीत करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येबाबत चर्चा झाली. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांची कमतरता भासत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमातील तृतीय वर्षांचे, नर्सिगच्या अंतिम वर्षांतील व पॅथालॉजीच्या शेवटच्या वर्षांतील विद्यार्थ्यांची सेवा घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत वर्धा जिल्हय़ासाठी असे मनुष्यबळ उपलब्ध करण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाला ४०० खाटांसाठी अखंडित प्राणवायू पुरवठय़ाची गरज आहे. त्यासाठी अतिरिक्त वीस केएल द्रव प्राणवायू भिलाईच्या प्रकल्पातून आणण्याची मागणी कळवण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. आतापर्यंत सेवाग्रामसाठी दोन टँकर उपलब्ध झाले आहे. सेवाग्रामला वाढीव शंभर खाटांसाठी प्राणवायू पुरवठय़ाची तयारी करण्यात येत असून एकूण ४०० पैकी ३५० प्राणवायू खाटा व अतिदक्षता विभागात ५० खाटा उपलब्ध होतील. सेवाग्रामचे डॉ. नितीन गगणे यांनी सांगितले की सेवाग्रामची प्राणवायू साठा असणारी टाकी एक दिवसानंतर भरली जाते. त्यासाठी योग्य पुरवठा झाला तर प्राणवायूचा प्रश्न मिटेल. सावंगीच्या रुग्णालयाला कोविड रुग्णालयाचा दर्जा आहे. रुग्णसंख्येच्या प्रमाणात साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी सागर मेघे यांनी केली. वर्धा जिल्हय़ातील जम्बो कोविड केंद्र पूर्ण करण्यासाठी कालावधी लागेल. तांत्रिक तज्ज्ञ व अन्य बाबी उपलब्ध झाल्यावरच हे केंद्र सुरू होण्याची शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. वर्धा जिल्हय़ातील दोन रुग्णालयात चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्हय़ातील रुग्ण दाखल होत आहे. ही प्रशंसेची बाब आहे. तालूका पातळीवर खाटा वाढविण्याची मागणी प्राणवायूची अडचण असल्याने सध्या पूर्ण करणे शक्य नाही. ज्या राज्यातून प्राणवायू आणल्या जातो, त्या ठिकाणीसुद्धा रुग्ण वाढत असल्याने राज्याला अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.