सासवडला पुढील वर्षी होणार असलेल्या ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या फ.मु. शिंदे आणि संजय सोनवणी यांनी विदर्भातील मतदारांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न चालविला असतानाच मूळ विदर्भाच्या असलेल्या डॉ. प्रभा गणोरकर यांनीही गुरुवारी वैदर्भीय मतदारांशी संपर्क साधून प्रचाराचा श्रीगणेशा केला.
औरंगाबादचे ज्येष्ठ कवी फ.मु. शिंदे यांनी गेल्या आठवडय़ात विदर्भ साहित्य संघाला भेट देऊन प्रसिद्धी माध्यमांबरोबर संवाद साधून मतदारांना आवाहन केले. संजय सोनवणी यांनीही नागपुरात येऊन चाचपणी करताना स्वत:चा अजेंडा मतदारांपुढे मांडला. फ.मु. शिंदे दोन दिवस मतदारांना भेटले. त्यांच्या भेटीची प्रसार माध्यमांनीही चांगली दखल घेतली, परंतु संजय सोनवणी यांच्या भेटीबद्दल अनेक मतदार अनभिज्ञ होते. महिला उमेदवार म्हणून अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या डॉ. प्रभा गणोरकर यांनी स्वत:ची बाजू आणखी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. गणोरकर यांनी अनेक मतदारांना पत्रे पाठविली आहेत. काहींशी त्यांनी दूरध्वनीवरूनही संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. डॉ. गणोरकर यांनी विदर्भ आणि मुंबईतून अर्ज भरला असल्याने त्यांना दोन्ही विभागातील मतदारांचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा असून, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा मुंबईतील मतदारांशी संपर्क साधण्याचे वर्तुळ पूर्ण केले. शिरीष पै यांनी प्रभा गणोरकरांना पाठिंबा जाहीर केला.
अध्यक्षपदाची निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन पोचली असली, तरी विदर्भ साहित्य संघाचा कल कोणत्या उमेदवाराकडे आहे, याबद्दलचे चित्र स्पष्ट झालेले नाही. फ.मु. शिंदे हे संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या निमंत्रणावरून आले होते. मात्र, त्यांच्या भेटीचाही किस्सा गाजत आहे. कारण फ.मु. विसा संघाच्या कार्यालयात पोचले तेव्हा सारे काही सामसूम होते. त्या दिवशी कार्यालयाला सुटी असल्याने फमुंवर माघारी परतण्याची वेळ येणार होती. त्यांच्यासोबत असलेले ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनाही अवघडल्यासारखे झाले. त्यानंतर धावपळ करून शिंदेंना सरळ म्हैसाळकरांच्या घरी नेऊन त्यांची बडदास्त राखण्यात आली. अन्यथा फमुंच्या भेटीचा ‘फियास्को’ झाला होता. फ.मु. शिंदे यांच्यापुढे खरे आव्हान प्रभा गणोरकर यांचेच समजले जात आहे. त्यामुळे त्यांनी विदर्भात पाय रोवणे सुरू केले आहे.