आजोबा शेताकडे गेलेले आहेत म्हणून शेळ्या चारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तीन भावंडांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी महालक्ष्मी सणाच्या दिवशी कंधार तालुक्यातील उमरज येथे घडली. या घटनेमुळे उमरज गावावर शोककळा पसरली. रोशनी विष्णू गायकवाड (वय ११), रोहन विष्णू गायकवाड (वय ९) व तनिषा देवानंद गायकवाड (वय ११) अशी मृत भावंडांची नावे आहेत.

उमरज गावालगतच्या शेतीमध्ये गणपत गायकवाड हे सालगडी म्हणून काम करतात. त्यांना बालाजी गायकवाड, विष्णू गायकवाड, देवानंद गायकवाड व बानाजी गायकवाड ही चार मुले असून ते सर्व जण हैदराबाद येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. या चौघांपकी विष्णू गायकवाड यांची पाचवीत शिकणारी मुलगी रोशनी गायकवाड, तिचा तिसरीतील भाऊ रोहन गायकवाड (९ वष्रे) तर देवानंद गायकवाड यांची पाचवीत शिकणारी मुलगी तनिषा गायकवाड हे तिघे गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होते. सोमवारी महालक्ष्मीचा सण व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाची सुटी असल्यामुळे हे तिघे भावंडे शेताकडे गेले. शेताच्या जवळ आले असता, नजीकच्या बंधाऱ्यात पोहण्याचा मोह या तिघांना आवरता आला नाही. मात्र पोहता येत नसल्यामुळे या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे उमरज गावावर ऐन महालक्ष्मीच्या सणादिवशी शोककळा पसरली. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.