यवतमाळ जिल्ह्यात करोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतअसताना मृत्यूदरही वाढताना दिसत आहे. येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या तीन करोनाबाधित रूग्णांचा आज सोमवारी मृत्यू झाल्याने जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली. हे मृत व्यक्ती अनुक्रमे पांढकरवडा, दिग्रस येथील तर उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधित मृतांची संख्या २० वर पोहचली आहे. दरम्यान आज दिवसभरात आणखी २२ करोनाबाधितांची भर पडली.

आजच्या तीन मृतांमध्ये यवतमाळ शहरातील तारपुरा येथील ५५ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील ३९ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या २२ जणांमध्ये १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील साईनगर येथील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील शिवाजीनगर येथील एक पुरुष, शास्त्रीनगर येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील चोंडी येथील एक महिला, पुसद शहरातील राम नगर येथील तीन पुरुष व चार महिला, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक महिला, उमरखेड येथील तीन महिला, दारव्हा तालुक्यातील मानकोपरा येथील एक पुरुष, वणी शहरातील एक महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या २२ रूग्णांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या जिल्ह्यात १५६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ९३ तर ‘रॅपीड ॲन्टीजन’ चाचणीद्वारे पॉझिटव्ह आलेले ६३ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५८० झाली आहे. यापैकी ४०४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. १०१ संशयित व्यक्ती सध्या विलगीकरण कक्षात आहेत.

नववधूच्या भाऊ करोनाबाधित –
कळंब तालुक्यातील जोडमोहा येथे एका लग्नघरातील नववधूचा भाऊ करोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आज त्याच्या कुटुंबातील अन्य दोघे सकारात्मक आढळले. गावात दोन दिवसात तीन रूग्ण आढळल्याने दहशत पसरली आहे. बहिणीच्या लग्नानंतर या तरूणाने आपल्या मित्रांना दोन वेळा पार्टी दिल्याची बाबही पुढे आली आहे. तर त्याच्या बहिणीच्या लग्नात नागपूर येथूनही बरीच पाहुणेमंडळी आली होती. यवतमाळच्या लोहारा येथील साईनगरी परिसरातील दोघे मायलेक अमरावती येथे आजारी व्यक्तीस भेटण्यासाठी गेले होते. अमरावतीमधील आजारी व्यक्तीचा करोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर यवतमाळ मधील दोघांचा अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आला.