लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलढाणा जिल्ह्यामध्ये मंगळवारी तिघांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३३ झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी चार नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एक अहवाल नकारात्मक, तर तीन अहवाल सकारात्मक आले आहेत. करोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगांव जामोद येथील ५६ वर्षीय पुरुष, मलकापूर तालुक्यातील बहापूरा येथील २४ वर्षीय महिला व मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील २० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

डोणगांव येथील महिला वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथून आली असून या महिलेचा अहवाल रिसोड येथेच सकारात्मक आला आहे. आतापर्यंत ८१ करोनाबाधितांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १३३ झाली. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी २५ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण १८७३ अहवाल नकारात्मक आले आहेत.