दगडफेकीच्या दोन-तीन घटना वगळता बंद शांततेत

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून कायगाव टोक येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने सोमवारी जलसमाधी घेतल्यानंतर मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली होती. हा बंद औरंगाबादेत कडकडीतपणे पाळण्यात आला. शहरामध्ये दोन-तीन किरकोळ दगडफेकीच्या घटना सोडल्या तर बंद शांततेत पार पडला. मराठा समाजातील तरुणांना शांततेचे आवाहन केल्यानंतर त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.

औरंगाबाद येथील क्रांती चौकात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून मागील तीन दिवस निदर्शने करण्यात येत आहेत. परळी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी क्रांती चौकात तीन दिवसांपासून निदर्शने करण्यात येत आहेत. आरक्षणाचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी सोमवारी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोक येथे कानडगाव येथील तरुण काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांनी गोदावरी नदीत उडी घेतली. त्यात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. त्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. हा बंद औरंगाबादेत कडकडीतपणे पाळण्यात आला. क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी बाराच्या सुमारास अदालत रोडवरील पगारिया या वाहनाच्या दालनावर आंदोलकांनी दगडफेक केली. निराला बाजार भागातील स्माईल हॉटेलवरही दगडफेक करण्यात आली. याशिवाय किरकोळ एक-दोन घटना वगळता शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. बहुतांश शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्गाला सुटी देण्यात आली होती. सिडको, हडको, गुलमंडीसह बहुतांश भागातील दुकाने, व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली होती. बंदला पूर्णपणे प्रतिसाद मिळाला.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. बिट मार्शल पथक, राज्य राखीव दलाच्या तीन ते चार तुकडय़ा तैनात असून पोलीस आयुक्त कार्यालयातील बहुतांश कर्मचारीही बंदोबस्ताच्या कामात तैनात असल्याचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्य़ातही पोलिसांची मोठी फौज तयार ठेवण्यात आली होती. कायगाव टोक येथे काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी चालून आलेला जमाव पांगवताना उस्मानाबाद येथील श्याम लक्ष्मण काटगावकर (वय ४६) यांचा मृत्यू झाला. काटगावकर यांचा मृत्यू प्रथमदर्शनी हृदयविकाराने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घाटीत सायंकाळी काटगावकर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

रा. प. महामंडळाला फटका

राज्य परिवहन महामंडळाच्या सिडको स्थानकातून दररोजच्या ५४४ फे ऱ्या मंगळवारी झाल्या नाहीत.   एकही किमीचा प्रवास होऊ शकला नाही. त्यामुळे सिडको बसस्थानकाला मिळणाऱ्या अंदाजे ११ लाख ११ हजार ६५० रुपयांच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे वाहतूक निरीक्षक अरविंद खैरनार यांनी सांगितले.

क्रांती चौकात निदर्शने

क्रांती चौकात मागील चार दिवसांपासून मराठा समाजातील तरुणांची आरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने सुरू आहेत. मंगळवारी शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ आदी नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रारंभी दानवे, जंजाळ यांना येण्यास मनाई केली. मात्र त्यांनी संवाद साधण्यासाठी आणि तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्यानंतर जंजाळ व दानवे यांना बोलण्यास परवानगी दिली. या वेळी दानवे व जंजाळ यांनी कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही, याची खबरदारी घेऊन तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. सुवर्णा मोहिते यांनीही प्रत्येक नेत्याने राजकीय पक्षाची चप्पल बाहेर ठेवूनच आंदोलनाच्या स्थळी यावे, तरुणांनी कुठल्याही पक्षाला लक्ष्य करू नये, असे आवाहन केले.

जिल्ह्य़ातील वातावरण शांतीपूर्ण

औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेले आंदोलन शांतीपूर्ण वातावरणात झाले आहे. श्याम काटगावकर यांच्या मृत्यूबाबत घटनास्थळावरील छायाचित्रण पाहूनच पुढील कारवाई करण्यात येईल. तूर्त जिल्ह्य़ात शांतता आहे.

 – डॉ. आरती सिंह, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद</strong>