भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरसा दाखवला आहे असे वक्तव्य आता काँग्रेसतर्फे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी प्रणव मुखर्जी यांच्या भाषणानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्येच संघावर खोचक शब्दात टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाऊन प्रणव मुखर्जी यांनी सहिष्णुता, विविधतेतून एकता, समाजाच्या प्रत्येक स्तराशी जोडले जाण्याची क्षमता निर्माण करणे या मुद्द्यांचा उल्लेख करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आरसा दाखवला आहे. आता प्रणव मुखर्जी यांनी दाखवलेली दिशा संघ अंगिकारणार का? असा उपरोधिक प्रश्नही सुरजेवाला यांनी विचारला आहे.

प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणातून संघाला भारताच्या इतिहासाची आठवण करून दिली. भारतात विविधेतून एकता आहे. संस्कृती, भाषा, धर्म या पलिकडे जाऊन ही एकता भारताने जपली आहे असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनी संघाचे कान टोचले असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणात अत्यंत चाणाक्षपणे संघ ज्या गोष्टी पाळत नाही अशावरच बोट ठेवले. हेडगेवार यांना त्यांनी भारतमातेचे सुपुत्र म्हटले ही बाब नक्कीच चांगली आहे असेही सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.

प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यापासूनच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनी प्रणव मुखर्जींना या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला होता. अनेकांनी तर प्रणव मुखर्जी एकेकाळी काँग्रेसमधून बाहेर कसे पडले होते त्याचीही आठवण करुन दिली आणि त्यावरही चर्चा केली. मात्र मला जे बोलायचे आहे ते मी भाषणातच बोलणार असे प्रणव मुखर्जींनी म्हटले होते. त्यांनी भाषण करताच काँग्रेसने त्यांची बाजू घेत संघावर शरसंधान केले आहे.