कोल्हापुरातील टोल आकारणी संदर्भातील घडामोडी पाहता १६ जून पासून टोल वसुली सुरू होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेत आयआरबी कंपनीने टोल वसुलीच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. १६ जूनपूर्वी टोल वसुलीसाठी पोलिस बंदोबस्त पुरवावा, अशी मागणी करणारे पत्र आयआरबी कंपनीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी राजाराम माने व महापालिकेचे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना दिले आहे. सध्या पोलिस भरती सुरू असल्याने टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त कमी असून, १६ जून रोजी पूर्णपणे पोलिस बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी माने यांनी दिली.
टोल विरोधातील जनहित याचिकेवर आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रशासनाला टोल वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे निर्देश दिले होते. या पाश्र्वभूमीवर शहरातील नऊ टोलनाक्यांवर पूर्ण क्षमतेने पोलिस बंदोबस्त द्यावा अशा मागणीचे पत्र आज पुन्हा आयआरबी व एमएसआरडीसीने जिल्हाधिकारी राजाराम माने यांना पाठविले. यामुळे बंदोबस्त दिल्याक्षणीच टोल वसुली सुरू होणार आहे.