अटीतटीची तिरंगी लढत, मान्यवर नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा अन् सत्तासंघर्षांची ताणलेली उत्सुकता यामुळे सर्वदूर गाजत असलेल्या कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आज शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी सांगता सभांनी विसावणार आहे.
परवा रविवारी (दि. २१) दिवसभरात कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस अशा पाच तालुक्यांतील १७५ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी दीड हजारांवर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णाच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सतर्क झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली जावी, सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांनी केले आहे. सुमारे ४६ हजारांवर सभासद मतदानास पात्र असून, तीनही पॅनेल जिद्दीने रिंगणात उतरल्याने प्रत्येक मतासाठी रस्सीखेच राहणार आहे. आज प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने सभांवर सभा, पदयात्रा व गाठीभेटींनी कृष्णाचे कार्यक्षेत्र ढवळून निघाले. मोठय़ा गावांवर तिन्ही पॅनेलची मतदार राहणार असल्याने सभासदांपेक्षा गावपुढारीच भाव खाऊन आहेत, पण उमेदवारांनी प्रत्येक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीचा प्रयत्न केला आहे.
‘कृष्णा’च्या निवडणुकीसाठी माजी मंत्री विलासकाका उंडाळकर हे डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे मार्गदर्शक राहिले आहेत. त्यांनी उघड भूमिका घेतल्याने त्यांचे काँग्रेस पक्षातीलच प्रबळ विरोधक आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाहीरपणे सक्रिय झाले असून, त्यांनी मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या विजयासाठी कंबर कसली आहे. या कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विरोधाला विरोध अन् काटय़ाने काटा काढण्याची खेळी खेळली गेली आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला शेकाप व डाव्या विचारसरणीच्या नेत्यांचा बिनशर्त पाठिंबा राहताना, ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी डॉ. सुरेश भोसलेंच्या सहकार पॅनेलला लक्ष्य केले. संस्थापक पॅनेलमध्ये नेत्यांची भाऊगर्दी दिसत नसलीतरी त्यांच्या सभांनाही यथायोग्य प्रतिसाद मिळत आहे. भोसलेंच्या सहकारमध्ये मातबर उमेदवारांचा समावेश राहिला आहे. तर, मदनराव मोहितेंनी विरोधी पॅनेलवर सडेतोड टीका करून चांगलेच रान उठवले आहे. परिणामी, उद्याची कृष्णा कारखान्याची ही निवडणूक निश्चितच कमालीच्या चुरशीने होईल असे चित्र आहे. दरम्यान, वाळव्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांची भूमिका अपेक्षेप्रमाणे गुलदस्त्यातच राहताना सध्या ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचे समजते.