मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या

१.  चंद्रावर आढळलं गोठलेलं पाणी, नासाचा दुजोरा; भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश
नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेलं पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे नासाने भारताकडून १० वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-१ कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे. नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर :

२.  सचिन अंदुरेच्या कबुलीमुळे सीबीआय तपासाबाबत प्रश्नचिन्ह
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येची कबुली सचिन अंदुरे या तरुणाने दिल्यामुळे या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासात अंधुरेचा साधा उल्लेखही नव्हता. परंतु राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने केलेल्या कारवाईत अंधुरेचे नाव पुढे आले. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा सीबीआयच्या प्रवक्तयाने केला आहे. वाचा सविस्तर :

 

३. मोदींच्या फिटनेस चॅलेंज व्हिडिओवर एक रुपयाचाही खर्च नाही: पीएमओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिटनेस चॅलेंज व्हिडिओवर एक रुपया देखील खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. या व्हिडिओसंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पीएमओने हे स्पष्टीकरण दिले आहे. वाचा सविस्तर :

 

४. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. खुल्या प्रवर्गाबरोबरच विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही परदेशात शिक्षणाची संधी मिळणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. वाचा सविस्तर :

५. किनाऱ्यांची सुरक्षा शिकायला ‘बेवॉच’ पाहा!
मनाला भुरळ घालणारे समुद्रकिनारे सुरक्षित ठेवायचे असतील, तर पॅमेला अँडरसनची ‘बे वॉच’ ही मालिका पाहाच, असा सल्ला थेट मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला मंगळवारी दिला. गणेशोत्सवापूर्वी किनाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी या मालिकेत दाखवलेल्या उपायांचा विचार करा, असे न्यायालयाने बजावले आहे. वाचा सविस्तर :