पर्यटकांच्या अतिभाराने पायाभूत सुविधांवर मोठा ताण; विकासाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

मुंबई व परिसरातील पर्यटकांना रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन परिसराचे आकर्षण वाढले असले तरी नागरी सुविधांवर वाढणारा ताण हा नवा प्रश्न डोके वर काढू लागला आहे. पायाभूत सुविधांचा अभाव आणि क्षमतेपेक्षा जास्त येणारे पर्यटक यामुळे पर्यटनस्थळांचा कोंडमारा होत असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्हय़ातील अलिबाग, मरुड, काशिद, नागाव, मांडवा, किहीम, आवास, आक्षी, रेवदंडा ही ठिकाणे गेल्या काही वर्षांत ‘न्यू इअर डेस्टिनेशन’ म्हणून नावारुपास आली आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने, राहण्याची आणि जेवणाची मुबलक सोय असल्याने दर वर्षी मुंबईतील लाखो पर्यटक नवीन वर्षांच्या स्वागतासाठी या परिसरात येऊ लागली आहे. यामुळे स्थानिकांसाठी मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. पण दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरी सुविधांवर याचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या अनुषंगाने येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेच आहे.

अलिबाग आणि मुरुड या दोन तालुक्यांतील सात ते आठ पर्यटनस्थळांवर ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत साधारणपणे तीन ते चार लाख पर्यटकांनी हजेरी लावली. माथेरान, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन ही ठिकाणेही पर्यटकांनी गजबजून गेली होती. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर एकाच वेळी पर्यटक दाखल झाल्याने वाहतूक समस्या तर उद्भवलीच, पण स्थानिक प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर त्याचा ताण पडला. याहून बिकट स्थिती २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत पाहायला मिळाली.

अलिबाग शहरापुरता विचार करायचा झाला, तर हे ४५० एकरांवर पसरलेले छोटसे शहर आहे. या शहराची लोकसंख्या साधारपणे २० हजारांच्या आसपास आहे. मात्र, या दोन-तीन दिवसांत अलिबाग शहरात तीस ते चाळीस हजार पर्यटकांनी भेट दिली. म्हणजेच शहराच्या एकूण लोकसंख्येच्या दुपटीहून अधिक पर्यटक या दोन दिवसांत अलिबागमध्ये दाखल झाले. अर्थातच याचा ताण स्थानिक नागरी सुविधांवर पडला. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, साफसफाई आदी सुविधा इतक्या मोठय़ा लोकसंख्येसाठी अपुरे ठरले. हॉटेल व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पोलीस यंत्रणेवरही अतिरिक्त ताण आला. यामुळे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले अलिबाग मुंबईतील गर्दीप्रमाणे कोंडलेले पाहायला मिळाले. हॉटेल आणि लॉजच्या शोधात पर्यटक रात्रभर फिरत होते. अरुंद रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली होती. पार्किंगच्या सुविधा कमी पडत होत्या. अलिबाग हे केवळ एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळांवर थोडय़ाफार प्रमाणात अशीच परिस्थिती होती.

या पाश्र्वभूमीवर पर्यटन केंद्रांच्या पायाभूत विकासाला चालना देणे गरजेच आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत दर वर्षी अलिबाग, मुरुड परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतली तर ती किती तरी अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत इथे दोन हजारहून अधिक हॉटेल, लॉज आणि निवास न्याहरी केंद्रे उभी राहिली आहेत. पण ज्या प्रमाणात पर्यटकांची आणि हॉटेलची संख्या वाढते आहे त्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणी, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृह या सुविधा विकसित झालेल्या नाहीत. स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे उत्पन्न मर्यादित असल्याने, या सुविधा विकसित करणे त्यांना शक्यही होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणांचा पर्यटनपूरक विकास करणे गरजेच आहे.

पर्यटन विकास आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

रायगड जिल्ह्यातील ५९ गावांच्या पर्यटन विकासासाठी २४३ कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, दोन वर्षे उलटली तरी राज्य सरकारकडून आराखडय़ाला मंजुरी मिळालेली नाही. एकीकडे रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ६०० कोटी आराखडा मंजूर झाला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांना निधीची वानवा आहे असे विरोधाभासी चित्र सध्या पाहायला मिळत आहे. २०१३-१४मध्ये हा आराखडा शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, आराखडा सादर होऊन तीन वर्षे लोटली तरी राज्य सरकारची मंजुरी मिळू शकलेली नाही आणि निधीही उपलब्ध होऊ शकलेला नाही.

जलवाहतुकीवर अतिरिक्त ओझे

अलिबाग हे मुंबईशी जलमार्गाने जोडलेले आहे. दररोज साधारणपणे तीन ते साडेतीन हजार प्रवासी जलमार्गाने प्रवास करतात. आठवडय़ाच्या शेवटी ही संख्या दहा ते बारा हजारांच्या घरात झाते. मात्र, ३० डिसेंबर ते १ जानेवारी या तीन दिवसांत जवळपास एक लाख पर्यटकांनी या जलवाहतुकीचा वापर केला असल्याचे मांडवा येथी बंदर अधिकारी अनिल िशदे यांनी सांगितले. पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन जादा प्रवासी बोटी सोडण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही ही व्यवस्था अपुरी पडत होती.

एसटीची सेवाही अपुरी : नवीन वर्षांचे स्वागत करून पर्यटक सोमवारी परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे सकाळपासूनच अलिबाग एसटी बसस्थानकात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, अलिबाग आगारातून सुटणाऱ्या बहुतांश गाडय़ा आधीच आरक्षित झाल्याने प्रवासी मोठय़ा प्रमाणात अडकून पडले. ही बाब लक्षात घेऊन आगारातून जादा बस सोडण्यात आल्या. मात्र, प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एसटीची सेवा अपुरी पडत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

अलिबाग छोटे शहर आहे. नगरपालिकेचे उत्पन्न मर्यादित आहे. अशा परिस्थितीत चांगल्या नागरी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. शहरातील स्वच्छता कायम रहावी, यासाठी प्रयत्न केले जातात. पण, क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक दाखल होतात तेव्हा नागरी सेवा पुरवणे जिकिरीचे बनते.

प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग