तलावात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता नववी वर्गातील दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि.17) रोजी नांदेड जिल्ह्यात घडली. घटनेनंतर दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
धर्माबाद नगरपालिकेअंतर्गत येणार्या मौजे बाळापूर लगत दोन तलाव आहेत. एक मोठा तलाव व दुसरा शिवरामसागर तलाव आहे. येथील गुरूकुल विद्यालयातील लखन सिद्दप्पा राचेवाड व साईचरण किशन आलूरोड हे दोन्ही विद्यार्थी इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत होते. मध्यांतराच्या सुटीत ते नजर चुकवून तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते.
उपरोक्त विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व तलावातील तळाशी गाळ असल्यामुळे गाळात रुतून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा घटनास्थळी होत होती. पोलिसांना ही घटना कळविल्यानंतर पो.नि.माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.सनगले, जमादार स्वामी यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
घटनेनंतर नागरिकांनी पाण्यात उतरून शोध घेतला तेव्हा लखन सिद्दपा राचेवाड याचा मृतदेह हाती लागला त्यानंतर काही वेळातच साईचरण किशन आलूरोड याचाही मृतदेह वर काढण्यात आला. दोघांचा मृतदेह बाहेर काढताच त्यांच्या माता-पित्याने हंबरडा फोडला. याप्रकरणी धर्माबाद पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
