शिवनेरी ही मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई अपडाऊन करणाऱ्यांसाठी चांगली बस सेवा आहे असे समजले जात होते. मात्र या बसेस बंद पडण्याचे प्रमाण वाढू लागल्याने ही बस सेवाही पीएमपीएमएलप्रमाणे आहे अशी टीका आता होऊ लागली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर देहूरोड येथे शिवनेरी बस अचानक बंद पडली. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली. प्रवाशांना काही कारण नसताना मनस्ताप झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार,पुण्याच्या स्वारगेट येथून पुणे-दादर शिवनेरी बस सेवा दर अर्ध्या तासाला असते.पुण्याहून मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या खूप मोठी आहे.त्यामुळे पुणे ते दादर बस सेवा दर अर्ध्या तासाच्या अंतराने असते.मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवनेरी बस चे झालेले अपघात आणि आज घडलेली घटना यामुळे प्रवाश्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.स्वारगेट येथून मुंबई-पुणे या जुन्या महार्गावर थांबा घेत शिवनेरी बस देहूरोड येथे पोहचली,मात्र अचानक बस एअर लॉक झाली यामुळं बस जागीच बंद पडली,बस बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली.

यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.याचा नाहक त्रास इतर वाहन चालकांना झाला आहे.एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बस सुरू झाली असून मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवनेरी बस ची परिस्थिती पीएमपीएमएल बस सारखी झाली आहे अशी तक्रार आता लोक करू लागले आहेत.