News Flash

रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ मदतीमुळे प्रवासी महिलेची सुखरुप प्रसुती

महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करताना महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या.

मुंबईहून कोल्हापुरकडे जाणार्‍या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशी महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या.

रेल्वेतील असुविधांबाबत अनेकवेळा विविध बातम्या ऐकायला मिळतात. परंतु रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या मदतीमुळे एका महिलेची सुखरुप प्रसुती झाल्याची सुखद घटना गुरुवारी जेजुरीत घडली. मुंबईहून कोल्हापुरकडे जाणार्‍या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये प्रवासी महिलेला प्रसव वेदना सुरु झाल्या. रेल्वेतील कर्मचाऱ्यांना हे समजताच त्यांनी तत्परता दाखवत या महिलेला सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर महिलेची सुखरुप प्रसुती झाली. या महिलेने रुग्णालयात मुलाला जन्म दिला.

बुधवारी रात्री सौ.शर्वरी निलेश कदम (वय ३०) या त्यांचे भाऊ डॉ.विशाल नलावडे यांच्याबरोबर मुंबई येथून आपल्या माहेरी विटा (जि.सांगली) येथे प्रसुतीसाठी जात होत्या. रेल्वेने पुणे स्टेशन सोडल्यानंतर एकच्या सुमारास त्यांना प्रसव वेदना सुरु झाल्या. यावेळी गाडीतील महिलांनी त्यांना धीर दिला. त्यांचे भाऊ डॉ.नलावडे यांनी त्वरीत रेल्वेतील कर्मचारी स.पो.निरीक्षक आर.एन.पांडे,राजेश कुमार,रमीझ शेख यांना याबाबत कल्पना दिली. यानंतर या कर्मचार्‍यांनी जेजुरी रेल्वे स्थानकातील प्रमुख राजमुनी राम यांचेशी संपर्क साधला. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पॅनेलवरील डॉ.नितीन केंजळे यांचेशी संपर्क साधला. यावेळी रात्रीचे दीड वाजले होते. डॉ.केंजळे त्वरीत जेजुरी रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनी रेल्वे येईपर्यंत १०८ क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका बोलावून ठेवली होती.

रात्री १ वाजून ५० मिनिटांनी ही रेल्वे जेजुरी स्थानकात आली. यानंतर या महिलेला तातडीने रुग्णवाहिकेतून जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी प्राथिमक उपचार केल्यानंतर महिलेला २० कि.मी. अंतरावर असलेल्या सासवड ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आले. तेथेही डॉक्टरांचे पथक तयार होते. गुरुवारी पहाटे चार वाजता या महिलेची सुखरुप प्रसुती झाली. तिचे भाऊ नलावडे हे विटा येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक असून बाळाला जन्म दिलेल्या सौ.कदम या विरार महापालिकेच्या रुग्णालयात परिचारीका म्हणून नोकरीस आहेत. त्यांना पाच वर्षांचा एक मुलगा असून त्यांनी गुरुवारी दुसर्‍या मुलाला जन्म दिला.

मध्यरात्री अडचणीच्या काळात देवदुतासारख्या धावलेल्या रेल्वे कर्मचारी व शासकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांमुळे आपली प्रसुती सुखरुप झाल्याने या महिलेच्या डोळ्यात आश्रू आले. डॉक्टरांनी त्यांना २५ ऑगस्ट ही प्रसुतीची तारीख दिली होती परंतु गुरुवारीच त्यांची प्रसुती झाली. रेल्वे प्रशासनातील तत्पर कर्मचारी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर यांचेकडून माणूसकीच्या भावनेतुन आम्हाला मध्यरात्री मिळालेली मदत मी कधीच विसरु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया महिलेचा भाऊ विशाल नलावडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 8:33 pm

Web Title: traveler woman safely delivery with railway administration help in jejuri
Next Stories
1 Video: जेएनपीटीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचा आयएएस अधिकाऱ्याला शिवीगाळ
2 सांगली पोलीस मुख्यालय परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी
3 सर्वोच्च न्यायालयाने कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीची ‘ती’ याचिका फेटाळली
Just Now!
X