करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्य़ात विलगीकरणाखाली असलेल्यांपैकी आणखी ११ जण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अशा रुग्णांची एकूण संख्या १५६ वर पोचली आहे. त्यापैकी  आतापर्यंत ४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून १०८ जणांवर उपचार चालू आहेत. तसेच बहुसंख्य बाधितांना करोनाची लागण झाल्याची कोणतीही बाह्य़ लक्षणे आढळून आलेली नाहीत.

मिरज येथून रविवारी सायंकाळी उशीरा दोन टप्प्यात ३२ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये रत्नागिरीतील २० आणि कळंबणी रुग्णालयात विलगीकरणात असलेला १ असे एकूण २१ अहवाल निगेटिव्ह आले होते. तर कळंबणी रुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात खेड तालुक्यातील ताले गावातील एकाच कुटुंबातील प्रत्येकी २ स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. ते सर्व मुंबई येथून दाखल झाले होते. त्यांना ताप असल्यामुळे विलगीकरणात ठेवण्यात आले होते. खेड तालुक्यातील वरावली गावी ठाणे येथून आलेला, तर मुलुंड येथून दयाल गावाकडे जाणाऱ्या दोघांना कळंबणी येथे ठेवले होते. तसेच संगमेश्वर तालुक्यातील तिघांपैकी वांझोळी येथील दोन आणि पांगरी येथील एक रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुहागर तालुक्यातील ताडेजंभारी आणि रत्नागिरी तालुक्यातील लांजुळ येथील प्रत्येकी १ रुग्ण करोनाबाधित आहे. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. बाधितांपैकी ९५ टक्के रुग्ण मुंबई किंवा ठाणे जिल्ह्य़ातून आलेले आहेत.

जिल्ह्य़ात घरी अलगीकरण करून ठेवलेल्या व्यक्तींची संख्या ७४ हजार १२४ असून २१३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण करून ठेवलेल्या आहेत. जिल्ह्य़ात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या ५ हजार ३०६ झाली असून त्यातील ४ हजार ७२३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या ३७२ इतकी आहे.

चाचणी प्रयोगशाळा मंजूर

चाकरमान्यांचा ओघ लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्य़ाला करोना प्रादूर्भावाबाबत चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. पालकमंत्री अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांनी ट्विट्द्वारे ही घोषणा केली आहे. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून  रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी आधी पुण्यात आणि नंतर मिरज येथे पाठवले जात आहेत. पण या चाचण्यांचे अहवाल मिळण्यासाठी विलंब लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणून कोकणासाठी स्वतंत्र चाचणी प्रयोगशाळेची जोरदार मागणी झाली होती. राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊ त, पालकमंत्री परब इत्यादींनी या संदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रूग्णालयात ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शासनाने १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये मंजूर केले आहेत.