मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात स्मृतिस्थळाजवळील वृक्षतोड नव्या वादात

औरंगाबाद : येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मृतीवन स्थळाजवळील झाडे तोडल्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी झाडे तोडणार नाही तर लावणार, असे आवर्जून सांगितले खरे. मात्र त्याच दिवशी महापालिकेत ज्या सेनेची सत्ता आहे, त्या महापालिकेच्या प्रशासनाने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या बांधकामात बाधित होणारी ११० झाडे तोडण्यासाठी जाहिरात प्रकाशित करून आक्षेप मागविलेले आहेत. त्यामुळे झाडे आणि पर्यावरण टिकविण्यासाठी सेनेची कोणती भूमिका नक्की खरी, असा प्रश्न पुन्हा विचारला जात आहे.

महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शिवसेनेला चिमटा काढत म्हटले होते, ‘बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी झाडे तोडणाऱ्यांना फटके दिले असते’. याच कार्यक्रमात शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळासाठी ४०० झाडे कापल्याची माहिती अंकुशराव कदम यांचे बंधू कमलकिशोर कदम यांनी पवार यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर या स्मृतिस्थळ विकासाचे काम ‘एमजीएम’मार्फत करून घ्यावे, असा सल्लाही पवार यांनी शिवसेनेला दिला होता.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्मृतिस्थळाच्या जागेची पाहणी केली. हे स्मृतिस्थळ झाडे न तोडता कशाप्रकारे करता येईल, याबाबतचे दोन आराखडे मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आले. या दोन्हींमधील चांगल्या बाबींचे एकत्रीकरण करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच स्मृतिस्थळ विकसित करताना झाडे तोडणार नाही तर लावणार अशी भूमिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

झाले काय? : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळील झाडे न तोडण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर तोच नियम गोपीनाथ मुंडे नियोजित स्मारकाला लावणे अभिप्रेत होते. तसे न होता महापालिकेने शहरातील विकासकामात आड येणाऱ्या झाडांची तोड करण्यासाठी ८ जानेवारी रोजी प्रसिद्धीस दिलेली जाहिरात शुक्रवारी प्रकाशित झाली. त्यात पहिल्या ओळीत ११० झाडे बाधित होऊ शकतात, असे म्हटले आहे. त्याचबरोबर नक्षत्रवाडी येथील सागवानाची २२५, ईटखेडा येथील सागवानाची १४, वड, कडुलिंब अशी सुमारे ४०० झाडे तोडण्यावर आक्षेप मागविले आहेत. विशेष म्हणजे आक्षेप दाखल करण्याचा कालावधी केवळ एक दिवसाचाच आहे.