उपेक्षित, वंचित व दुर्लक्षित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रुग्णालयासाठी २०० खाटांच्या आराखडय़ाला मंजुरी मिळाली आहे. यातील १०० महिलांसाठी व १०० पुरुषांसाठी आहेत, असे रुग्णालय बनविण्यासाठी प्रयत्न करू, असे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले.
शहराच्या प्रभाग तीनमधील गांधीनगर, माउलीनगर व हुसेननगर भागात सिमेंट रस्ते व काँक्रीट नाल्यांसह विविध विकासकामांचा प्रारंभ क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाला. आमदार सय्यद सलीम, डॉ. भारतभूषण क्षीरसागर, सुभाष सारडा, रणजितसिंह चौहान, अशोक डक, अर्जुन गायकवाड आदी उपस्थित होते. पेठ बीड भाग कष्टकऱ्यांची संख्या जास्त असलेला भाग आहे. या भागात एक कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकार १ कोटी व जिल्हा नियोजनच्या माध्यमातून १ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एमआयडीसी, बहिरवाडी, आनंदवाडी या बायपास रस्त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल. अन्न, वस्त्र व निवारा याबरोबरच पाणी, वीज व रस्ता या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.