तुळजाभवानी मंदिर समितीविरोधात भक्तांमध्ये नाराजी

तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने भक्तांच्या सोयीसुविधांविषयी मोठय़ा प्रमाणावर फेरबदल करण्यात येत आहेत. मात्र मंदिराच्या पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा खंडित करण्यासह मंदिराच्या वास्तुशास्त्रातही बदल करण्यात येत असल्याने पुजाऱ्यांसह भक्तांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. मंदिर समितीच्या कारभाऱ्यांनी तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहाचा उंबरठाच काढून टाकल्याने माथा कुठे टेकायचा, असा सवाल पुजारी-भक्तांमधून केला जात आहे.

हिंदू धर्मात घराच्या उंबरठय़ाला मोठे महत्त्व आहे, तर मंदिराच्या उंबरठय़ावर माथा टेकून देवदेवतांसमोर भाविक नतमस्तक होतात. मात्र तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने सुधारणेच्या नावाखाली मंदिराच्या गर्भगृहाच्या पुरातन दरवाजाचा उंबरठाच हटविल्याच्या प्रकारामुळे समितीच्या कारभाराविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहासमोर चांदीचा दरवाजा आहे. अठराव्या शतकातील हा दरवाजा असल्याचे सांगण्यात येते. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात आलेले भाविक दरवाजाच्या उंबरठय़ावर माथा टेकून नतमस्तक होत होते. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मंदिराच्या पुरातन भिंतीची तोडफोड करण्यासह चक्क उंबरठादेखील हटविला गेला. नवरात्र महोत्सव कालावधीत केलेला हा बदल गर्दी ओसरल्यानंतर पुजाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पुजाऱ्यांसह भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.