सांगलीच्या बाजारात हळदीची आवक दीडपटीने वाढली असून जीएसटीची रक्कम अडकणार या भीतीने व्यापारी खरेदीस नाखूश असले तरी दर मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत क्विंटलला हजार रुपयांनी कमी झाले आहेत. खपली वगळता सर्वच धान्याचे दर यंदा उतरले असून हरभऱ्याचा हमी भाव चार हजार असताना सौदे मात्र निम्म्यावर म्हणजे दोन हजार दोनशे रुपयांवर होऊ लागले आहेत. तर मध्यंतरी साखरेचे दर उतरल्याने गुळाचेही दर उतरले. तर उतरलेल्या साखर दराचा लाभ घेत काही उत्पादकांकडून गुळामध्ये साखरेची भेसळ केली जात असल्याने दरही पडले आहेत.

गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा सांगलीच्या बाजारात हळदीची आवक वाढली आहे. बाजारात हळद खरेदी व्यापाऱ्यांच्या बिलामध्ये अडत्याकडून जीएसटीचे पाच टक्के कर लावून वाढवून धरले जात असल्याने याचा तिढा खरेदीदारांनी उपस्थित केला आहे. याचा परिणाम म्हणून सौदेच बंद पडत आहेत. कारण खरेदीवर जीएसटीची रक्कम आकारली जात असून याचा खरेदीदारांना परतावा मात्र विक्रीवेळी मिळत असल्याने या रकमेपोटी सुमारे ४३ कोटी नाहक अडकले जात असल्याचा आक्षेप खरेदीदारांचा आहे.

खरेदीदार लाखो टन हळदीची खरेदी करून त्याची साठवणूक करतात. ज्यावेळी हळदीला दर चांगला मिळेल त्यावेळी त्याची विक्री केली जात असल्याने हळदीवरील जीएसटी करापोटी अडत्याकडून आकारली जाणारी रक्कम अडकून राहत असल्याचा आक्षेप आहे.  बाजार समितीने याबाबत अन्य बाजार समितीतील व्यवहाराची पाहणी करण्यासाठी समितीही नियुक्त केली. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार खरेदीदारांना बिले देत असताना जीएसटीची निरंक आकारणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा कधी तरी याबाबत विचारणा झाली तर अडत दुकानदार अडकणार असल्याने याबाबत एकमत झालेले नाही. परिणामी यंदा हळदीचे सौदे चालू-बंद अशा स्थितीत सुरू आहेत.

गेल्या वर्षी हळदीला क्विंटलला कमाल दर एक हजार ४२६ तर किमान दर सात हजार ४४६ रुपये मिळाला. मात्र यंदा आवक वाढल्याने आजचा कमाल दर ११ हजार ९२ तर किमान सहा हजार ६१ रुपये असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली. गेल्या वर्षीचा सरासरी दर नऊ हजार ४३६ तर यंदाच्या हंगामातील सरासरी दर आठ हजार ५७६ रुपये क्विंटल आहे.

बाजारात खपली गव्हाचा दर साठ रुपये असताना गेल्या वर्षी सांगलीच्या बाजारात आवक वाढल्याने दर निम्म्यावर आला होता. साध्या गव्हाबरोबर खपली गव्हाचा दर आला होता. यंदा मात्र खपलीची आवकच कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. पूर्णपणे नसíगक बियाणे म्हणून खपली गव्हाकडे पाहिले जात असले तरी याचा वापर महाराष्ट्रात अत्यल्प आणि तामिळनाडू व केरळ मध्ये जास्त प्रमाणात होत असल्याचे व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले.

यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाची काढणी झाली असून आता मार्चअखेरीस देणी भागविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात हरभरा बाजारात येत आहे. हरभऱ्याचा हमीभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल असा शासनाने ठरवून दिला असला, तरी शासनाची हमी खरेदी केंद्रेच सुरू नसल्याने व्यापारी वर्गाकडून दर पाडले आहेत. सध्या दोन हजार २०० रुपये दराने हरभरा खरेदी सांगलीच्या बाजारात सुरू आहे.

गुऱ्हाळधारकांना फटका

गेल्या महिन्यापर्यंत साखरेचे दर दोन हजार ९०० रुपयापर्यंत खाली आले होते. याचा नेमका लाभ गूळ उत्पादकांकडून घेतला जात होता. विशेषत कर्नाटकातून आवक होत असलेल्या गुळामध्ये साखरेची भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून गुळाला मागणी कमी झाली. याचा फटका कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ातील गुऱ्हाळधारकांना बसला. सांगलीच्या गुळाला प्रामुख्याने गुजरात आणि मध्य प्रदेशातून चांगली मागणी आहे. मात्र, दर कमी झाल्याने शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळघरे शिवरात्रीपासूनच बंद पडली आहेत.

बाजारात संकरित आणि शाळू ज्वारीची आवक वाढल्याने दर उतरले आहेत. बार्शीचा शाळू मोठय़ा प्रमाणात बाजारात आल्यानंतर हा दर आणखी उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ग्राहकांकडून कर्नाटकातील नंद्याळ परिसरात उत्पादित होत असलेल्या सुवर्णकारला मागणी वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सुवर्णकार ज्वारीमध्ये शाळू, संकरित ज्वारीच्या तुलनेत साखरेचे प्रमाण कमी असल्याने मधुमेही रुग्णांकडून या ज्वारीची मागणी जादा होत असल्याचे सांगण्यात आले.