चढ-उतार करावा लागत असल्यामुळे नागरिकांची दमछाक

लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील विविध योजनेअंतर्गत घरापासून वंचित झालेल्या नागरिकांना राहण्यासाठी पालिकेमार्फत तयार करण्यात आलेली रामदेव पार्क येथील रेंटल हाऊसिंग इमारतीचे उद्वाहन (लिफ्ट) गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. त्यामुळे नाइलाजाने येथील रहिवाशांना विसाव्या मजल्यावरून चढ-उतार करावा लागत असल्यामुळे अनेकांची दमछाक होत असून आरोग्याचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

भाईंदरच्या बंदरवाडी येथील झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संक्रमण कालावधीपर्यंत राहण्यासाठी घरे मिळावीत अशी मागणी केली जात होती. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेला एमएमआरडीएकडून रेंटल हाऊसिंग योजनेअंतर्गत रस्तारुंदीकरण यामध्ये बाधित झालेल्या कुटुंबांसह इतर योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना राहण्यासाठी भाईंदरच्या इंद्रलोक फेस ६ येथे इमारत तयार करून देण्यात आली आहे.

या इमारतीमध्ये बंदरवाडी येथील १५० नागरिकांना जुलै २०१९ मध्ये पालिकेने घरे दिली आहेत. तर मीरा रोडच्या हटकेश परिसरातील अपंग नागरिकांनादेखील ३० हून अधिक घरे देण्यात आली आहेत.

मीरा-भाईंदर पालिकेची ही इमारत २० मजल्यांची असून त्यात १९३ घरे आहेत. या इमारतीमधील आठ महिन्यापूर्वी एक उद्वाहन दुरुस्तीअभावी बंद पडले आहे. त्यामुळे मागील सात महिन्यांपासून या इमारतीमध्ये राहणारे नागरिक पर्यायी दुसऱ्या उद्वाहनामधून ये-जा करत होते.

मात्र मागील महिन्यात दुसरेदेखील उद्वाहन बंद पडल्याने नागरिकांना नाइलाजास्तव विसाव्या मजल्यावरून वर-खाली चालत यावे लागते आहे.

यामध्ये सर्वाधिक त्रास अपंग नागरिकांना सहन करावा लागत आहे. उद्वाहन बंद असल्याची माहिती पालिका प्रशासनाला देऊनदेखील दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

उद्वाहन देखभाल-दुरुस्तीबाबत गेल्या आठ महिन्यांपासून सतत पालिकेकडे पाठपुरावा करीत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा केला जात आहे.
– लक्ष्मीबाई उबाळे, स्थानिक वृद्ध महिला

या भागातील उद्वाहनाचे काम करण्यात आले होते; परंतु त्यामधील काही लोकांनी उद्वाहनाची दुरवस्था केली आहे. त्यामुळे आता पुन्हा दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येत आहे.
– दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग