News Flash

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीअंतर्गत दोन गटांमध्ये अविश्वास कायम!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात माजी मंत्री सुरेश धस यांनी केवळ दोन ठिकाणीच हजेरी लावली. मात्र, पवारांच्या दौऱ्यामध्ये धस अलिप्तच

| June 1, 2015 01:20 am

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात माजी मंत्री सुरेश धस यांनी केवळ दोन ठिकाणीच हजेरी लावली. मात्र, पवारांच्या दौऱ्यामध्ये धस अलिप्तच राहिल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीतून दोन नेत्यांच्या गटांनी पक्षाचेच जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. या पाश्र्वभूमीवर पवारांच्या दौऱ्यातही पक्षांतर्गत नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याने ठरावाबाबतचे अविश्वासाचे वातावरण कायम असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून पवार यांचेही जिल्ह्य़ात बारीक लक्ष असते. विधानसभा निवडणुकीत सहापकी पाच ठिकाणी पराभव झाला. जिल्ह्यात आता केवळ जि. प.ची एकमेव सत्ता राष्ट्रवादीकडे राहिली आहे. मात्र, पक्षांतर्गत नेतृत्वाच्या गटबाजीत मागील महिन्यापासून भाजपच्या मदतीने राष्ट्रवादीच्याच दोन गटांनी जि. प. अध्यक्ष पंडित यांना हटविण्यासाठी अविश्वास ठरावाचा खेळ जमविण्यास सुरुवात केली. मागील ६ महिन्यांत बदलत्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. त्यामुळे पक्षाची सूत्रे धनंजय मुंडे व आमदार अमरसिंह पंडित या जोडीकडे गेली. त्यामुळे इतर प्रस्थापित नेते अस्वस्थ झाल्याने आमदार पंडित यांचे बंधू विजयसिंह यांना पदावरून हटविण्याचे प्रयत्न सुरू झाले. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ पाहणीसाठी दोन दिवसांचा दौरा केला. गेवराईपासून या दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर पवारांच्या गाडीचे सारथ्य धनंजय मुंडे यांनी केले. बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे रात्रीचे भोजन घेऊन पवार यांनी रविवारी सकाळी अॅड. एकनाथ आवाड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या ठिकाणी माजी मंत्री सुरेश धस उपस्थित होते. त्यानंतर पवार हे चोरंबा, वडवणी, ढेकणमोहा, पाली, बीड येथे भेटी देऊन पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्हीला गेले. वैद्यकिन्ही हे ठिकाण आष्टी मतदारसंघात येते. त्यामुळे धसही या ठिकाणी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये प्रमुख नेतृत्व असलेले सुरेश धस हे पवार यांच्या दौऱ्यात मात्र फारसे दिसले नाहीत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धस यांनी पत्नी संगीता यांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून निवडून आणले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचे २ समर्थक, तसेच धस यांची पत्नी भाजपच्या पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने नवी राजकीय समीकरणे उदयाला आली. मात्र, त्यातूनच जि. प.मध्ये राष्ट्रवादीअंतर्गत दोन नेत्यांच्या गटांनी सदस्यांची जुळवाजुळव करीत अध्यक्ष पंडित हटाव मोहीम चालवली. या पाश्र्वभूमीवर पवारांच्या दौऱ्यामुळे जि. प.  अध्यक्षांविरुद्धचा कथित ठराव बारगळल्याचे मानले जात असले, तरी धस यांच्या अलिप्त भूमिकेमुळे या ठरावाबाबत अविश्वासाचे वातावरण कायम असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 1:20 am

Web Title: two ncp group confuse in beed zp
टॅग : Beed,Ncp,Suresh Dhas,Zp
Next Stories
1 वादळी पावसामुळे हिंगोलीत दोन शेतकरी ठार, ३ जखमी
2 आकोट बाजार समिती सचिवाची चौकशी
3 जंगली हत्ती सांभाळण्यास वनविभाग असमर्थ
Just Now!
X