चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर पूर्वेकडील रान परसोडी गावांत लोहयुगीन (महापाषाणयुग) काळातील दोन शिलास्तंभ इतिहास अभ्यासक अमित भगत यांना शोधमोहिमेदरम्यान आढळून आले आहेत. त्यांच्या मते यांचा कालखंड साधारण इसवी सन पूर्व ५०० ते इसवी सन २०० यादरम्यान असावा.

शिलास्तंभांबाबत स्थानिकांत कुतुहल आहे. शिलास्तंभांना स्थानिक लोक ‘मामा-भांजा’ म्हणून संबोधतात. याचे कारण त्यांची उंची व आकारमानांत दिसून येणारा फरक होय. यातील मोठा शिलास्तंभ २ मीटर उंचीचा असून त्याची रूंदी १.६५ मीटर व जाडी ३६ सेमी आहे. या स्तंभापासून जवळच ५० फुटांवर असणारा दुसरा शिलास्तंभ ०.७५ मीटर उंच असून ०.४५ मीटर रूंद आहे. व त्याची जाडी २७ सेंमी आहे.

अमित भगत यांनी यापूर्वीच नागभिड जवळील डोंगरगाव भागात ४६ शिलास्तंभ शोधून काढले होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सुद्धा त्यांच्या या संशोधनाची दखल घेतलेली आहे.

डोंगरगाव भागात त्यांना इतिहास पूर्व वसाहतींचा सबळ पुरावा म्हणून काळय़ा व लाल रंगाची अभ्रकयुक्त खापरे तसेच लोहभट्टीचे अवशेष मिळाले.

या शिलास्तभांसोबतच १३ शिलास्तंभ  सभोवतालच्या गावांत आढळून आले आहेत. यात पन्होली येथे दोन, कोसंबी गवळी व वासला येथे प्रत्येकी तीन व मिंडाळा येथील पाच स्तंभाचा समावेश आहे.

पन्होली गावात आढळून आलेल्या दोन शिलास्तंभांना विशेष महत्व आहे. हे गाव मौर्यकाळातील (इसवी सन पूर्व तिसरे शतक) असून नजीकच्या देवटेक व चिकमारा यांचे मिळून ते एक मोठे नगर होते.

देवटेक येथील सम्राट अशोककालीन शिलालेखावरून यास पुष्टी मिळते. सदर परिसरात प्राचीन वसाहतीचे अवशेष असणारे साखरा रिठ आहे. या ठिकाणी दगडी हत्यारे, लोखंडी अवजारे, काळी-तांबडी खापरे व तांब्याची नाणी सापडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कदाचित हे महापाषाणयुगीन संस्कृतीचे वसाहतीचे स्थळ असावे असे वाटते. यादिशेने अधिक संशोधनाची गरज असल्याचे अमित भगत यांनी सांगितले.