शेतकऱय़ांच्या कर्जमाफीवरून सरकारला कोंडीत पकडू पाहणाऱया विरोधकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी खडे बोल सुनावले. पंधरा वर्षे तुम्ही सत्तेत होतात, त्यावेळी शेतकऱय़ांसाठी काय केले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विचारला. त्याचवेळी शेतकऱयांना मदत केली पाहिजे, याचेही त्यांनी समर्थन केले.
शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून गेले चार दिवस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विधानभवनामध्ये आंदोलन करीत आहेत. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांकडून हाच मुद्दा सातत्याने लावून धरण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱयांना कर्जमाफी देता येणार नसल्याचे म्हटल्यावर विरोधकांनी विरोधाची धार आणखी तीव्र केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आता जे शेतकऱयांची कर्जमाफीची मागणी करीत आहेत. ते १५ वर्षे सत्तेत असताना त्यांनी शेतकऱयांसाठी काय केले. त्यावेळी आम्ही पण शेतकऱयांसाठी आंदोलने केली होती. त्याला यांनी काय प्रतिसाद दिला हे सर्वांना माहितीच आहे. राज्यात सध्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱयांना मदत केली गेली पाहिजे. पण या विषयावरून राजकारण केले जाऊ नये, असे त्यांनी सांगितले.